भारतातील प्रत्येक राज्याची ‘ही’ आहे खासियत


आपला भारत देश हा अनेकविध परंपरांनी, संस्कृतींनी नटलेला देश आहे. प्रत्येक प्रांताची भाषा निराळी, तेथील परंपरा निराळ्या, संस्कृती निराळी. ह्या विविधतेला अनुसरून, प्रत्येक राज्यामध्ये काही खास वस्तू तयार होत असतात. किंबहुना ह्या वस्तू त्या त्या राज्यांच्या खासियती बनल्या आहेत. त्यामुळे प्रवासाच्या निमित्ताने निरनिराळ्या राज्यांना भेटी देताना, तेथील अनुभव आठवणीत राहावेत ह्याकरिता हरेक राज्याच्या खासियत असणाऱ्या ह्या वस्तूंचा संग्रह आपल्याकडे अवश्य असावा.

आंध्र प्रदेश आणि तेलंगाणा ही राज्ये पोचमपल्ली, इक्कत कपड्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे बुदिथी येथे बनविल्या जाणाऱ्या पितळ्याच्या वस्तू देखील प्रसिद्ध आहेत. तेलंगाणा येथे मोत्याच्या आभूषणांची मोठी बाजारपेठ आहे. अरुणाचल प्रदेशची खासियत येथील बांबूच्या वस्तू आहेत. ह्यामध्ये निरनिरळ्या प्रकारच्या टोपल्या, चटया, टोप्या, आभूषणे, इतर भांडी अश्या वस्तू प्रसिध्द आहेत. आसाम म्हटले, की चहाच्या हिरव्यागार बागा डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आसाम येथे होणारा चहा जगभरामध्ये निर्यात होतो. त्यामुळे येथे गेल्यावर येथील चहाच्या बागांमध्ये फेरफटका मारून, येथे होणाऱ्या निरनिराळ्या चहांचा आस्वाद जरूर घ्यावा.

मधुबनी पेंटिंग ही बिहारची खासियत आहे. हाताच्या बोटांच्या सहाय्याने, किंवा झाडाच्या फांद्या वापरून, ब्रश चा उपयोग करून ही पेंटींग्ज नैसर्गिक रंगांचा वापर करून बनविली जातात. बिहारच्या मिथिला प्रांतामध्ये मधुबनीचे काम जास्त पहावयास मिळते. यामध्ये पाच निरनिराळे प्रकार असून, भरणी, कचनी, तांत्रिक, गोद्ना आणि कोह्बार अश्या पाच प्रकारांमध्ये मधुबनी पेंटिंग उपलब्ध असतात. छतीसगढ़ ह्या राज्याची खासियत तेथील टेराकोटाच्या वस्तू आहेत.

आरसेकाम केलेली तोरणे, चादरी, बांधणी आणि लेहेरीया साड्या ही गुजरात आणि राजस्थानची खासियत आहे. राजस्थान मध्ये मीनाकारी केलेल्या वस्तूही अतिशय लोकप्रिय आहेत, तर कोरीवकाम केलेल्या लाकडी वस्तू ही खासियत आहे हरियानाची. हिमाचल प्रदेशाला भेट दिली, की तेथील खासियत असलेली ‘कुलू’ टोपी ही खरेदी करायलाच हवी, आणि काश्मीरमध्ये भटकंती करताना तेथील अतिशय नाजूक नक्षीकाम असलेल्या मौल्यवान पश्मीना शाली आवर्जून नजरेखालून घालायला हव्यात. काश्मिरी गालिचेही अतिशय प्रसिद्ध असून, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ह्यांना मोठी मागणी आहे. कर्नाटक राज्यातील म्हैसूर सिल्क आणि केरळ राज्यातील कथकली मुखवटे संग्रही असावेतच.

महाराष्ट्र म्हटला की भरजरी पैठणी आणि कोल्हापुरी चप्पल हवीच. तर मणिपूर येथील पारंपारिक पोशाख मेखला-चादर येथील खासियत आहे. नागालँडमधील शाली, मेघालयातील गवती चटया, आणि मिझोरम येथे खास तयार होणारे पुआन नामक कापड ह्या येथील खासियती आहेत. ओडिशा राज्याची खासियत ‘पट्टचित्र’ पेंटींग्ज असून, येथील संबलपुरी साड्याही अतिशय प्रसिद्ध आहेत, तर पंजाब राज्यातील ‘फुलकारी’ हा भरतकामाचा प्रक्रार अतिशय प्रसिद्ध आहे.

Leave a Comment