नोटाबंदीनंतर जनतेच्या हाती आल्या दुप्पट नोटा


कॅशलेस इकॉनॉमी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचे उद्दिष्ट असल्याचे सांगण्यात आले असले, तरी नोटाबंदीनंतर जनतेच्या हातात पुन्हा मोठ्या प्रमाणावर नोटा पोचल्या आहेत. उलट लोकांच्या हातात दुप्पट नोटा पोचल्या असल्याचे रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीत स्पष्ट झाले आहे.

रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, नोटाबंदीच्या पूर्वी जनतेच्या हातात एकूण 17 लाख कोटी रुपये होते. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी जाहीर केली तेव्हा देशातील जनतेच्या हातात 7.8 कोटी रुपयांचे चलन होते. ते आता वाढून 18.5 लाख कोटींपर्यंत पोचले आहे. नोटाबंदीनंतरच्या तुलनेत ही संख्या दुपटीपेक्षा जास्त आहे. काही महिन्यांपूर्वी देशात चलनाचा निर्माण झालेला तुटवडा कृत्रिम होता, हे या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.

रिझर्व्ह बँकेच्या ताज्या “मनी सप्लाय” नावाच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. नोटाबंदीनंतर देशात 8.9 लाख कोटी रुपयांचे चलन होते, तेही आता दुप्पट होऊन 19.3 लाख कोटी रुपयांपर्यंत पोचले आहे, असे या अहवालात म्हटले आहे.

या अहवालानुसार, 25 मे 2018 पर्यंत जनतेच्या हातात 18.5 लाख कोटींचे चलन होते. मागील वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण 31 टक्के जास्त होते. सध्या 1 जून 2018 पर्यंत एकूण 19.3 लाख कोटी रुपयांचे चलन लोकांच्या हातात होते. मागील वर्षीच्या तुलनेत हे 30 टक्के जास्त होते, असे पीटीआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Leave a Comment