रोबोटला सोबत घेऊन अंतराळ प्रवाशांचे उड्डाण


अंतराळ प्रवाशांनी एखाद्या यंत्रमानवाला सोबत घेऊन अंतराळ प्रवास करण्याची घटना पहिल्यांदाच घडली आहे. रशियाच्या सोयुझ अंतराळयानातून तीन प्रवाशांनी उड्डाण केले असून त्यांच्या सोबत एक अत्याधुनिक रोबोटही आहे.

कझाखस्तानातील बायकोनूर प्रक्षेपण केंद्रावरून या यानाने नुकतेच उड्डाण केले. या यानात जर्मनीतील अलेक्झांडर गॅर्स्ट, अमेरिकेची सेरेना औनन चान्सेलर आणि रशियाचा सेर्गेई प्रोकोप्येव हे तीन प्रवासी आहेत. या तिघांसोबत जर्मन स्पेस एजन्सीने तयार केलेला आर्टिफिशियल इंटेलिजन्सने सुसज्ज असलेला एक यंत्रमानव सायमन हाही होता.

या यानाचे उड्डाण करण्यापूर्वी गॅर्स्ट याने ट्वीट केले, “उड्डाणाच्या आधी हा शेवटचा संदेश. रॉकेटमध्ये चढत आहे. सर्व काही ठीक झाले तर दोन दिवसांनी पहिला स्टॉप आयएसएस (आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक) असेल. काळजी घ्या, मित्रांनो.”
हे सर्व जण जमिनीपासून 400 किलोमीटर दूर असलेल्या आयएसएसवर सहा महिने घालविणार आहेत.

सायमन हा चेंडूसारखा यंत्रमानव आहे. कोणताही आधार न घेता हवेत तरंगम्याची कला त्याने शिकून घेतली आहे. अंतराळ स्थानकात तो कॅमेरामनचे काम करेल. तसेच अनके प्रकारच्या लेखी व मौखिक संदेशांचे तो उत्तर देईल.

Leave a Comment