नी रिप्लेसमेंटसाठी शस्त्रक्रिया झाल्यानंतर काळजी घेणे आवश्यक


नी रिप्लेसमेंट सर्जरी करविल्यानंतर गुडघ्याची काळजी घेणे आवश्यक असते. ह्याबद्दल अनेक रुग्णांना कोणतीही कल्पना नसल्याने हे रुग्ण पूर्वी प्रमाणेच सर्व कामे करू लागतात. परिणामी नुकतीच शस्त्रक्रिया झाल्याने नाजूक अवस्थेत असलेल्या गुडघ्यावर ताण येऊ लागतो. ह्या बाबतीत रुग्णांनी जास्त जागरुक राहून शस्त्रक्रिया झाल्यानंतर गुडघ्याची योग्य काळजी घेतल्यास, सर्जरी नंतर कोणत्याही प्रकारचा त्रास न होता, रुग्ण लवकरच गुडघ्याची हालचाल पूर्वीप्रमाणेच करु शकतात.

सर्जरी होण्यापूर्वी ही सर्जरी कशासाठी केली जात आहे, कशी केली जाणार आहे ह्याची स्पष्ट पूर्वकल्पना रुग्णाला दिली जाते. मात्र एकदा सर्जरी पार पडल्यानंतर हॉस्पिटल मधून घरी आल्यानंतर काही दिवस कोणत्या प्रकारे काळजी घेतली जावी हे रुग्णाला ठाऊक असूनही, डॉक्टरांनी त्या बाबतीत दिलेल्या सल्ल्याचे रुग्णाकडून बरेचदा पालन केले जात नाही. त्यामुळे सर्जरी झालेला गुडघा पुन्हा त्रास देऊ लागतो. एकदा सर्जरी झाल्यानंतर गुडघ्याची हालचाल पूर्वपदावर येण्यासाठी सहा आठवड्यापर्यंतचा कालावधी लागू शकतो. ह्या दरम्यान रुग्णाने चालण्यासाठी वॉकरचा उपयोग करणे आवश्यक आहे, जेणेकरून शरीराचा भार गुडघ्यांवर येणार नाही. तसेच जिने चढ-उतार करताना कठड्यांचा आधार घेणे गरजेचे असते. ज्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आहे, त्यावर कमीत कमी भार असेल हे पाहणे गरजेचे आहे. त्यामुळे जिने चढताना ज्या पायावर सर्जरी झालेली नाही त्या पायाच्या मदतीने एकेक पायरी चढावी. तसेच जिने उतरताना आधी सर्जरी झालेला पाय खालच्या पायरीवर टाकावा, जेणेकरून सर्जरी झालेला गुडघा वाकणार नाही.

नी रिप्लेसमेंट सर्जरी झालेल्या रुग्णांनी दररोज चालले पाहिजे असे डॉक्टर्स म्हणतात. तसेच सुरुवातीला थोडे अंतर चालणे सुरु करून हळू हळू अंतर वाढविणे आवश्यक आहे. ह्यामुळे सर्जरी नंतर वजन नियंत्रणात राहणे शक्य होते. ही शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांनी ओणवे बसणे टाळायला हवे, तसेच सर्जरी झाल्यानंतर गुडघ्याची हालचाल पूर्ववत झाली असली, तरीही दर वर्षी एकदा ऑर्थो-स्पेशालिस्टचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच सर्जरी झाल्यानंतर छातीमध्ये दुखणे, दम लागणे, गुडघ्यावर अचानक खूप सूज येणे, वेदना होणे अश्या समस्या उद्भविल्यास त्वरित तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment