ह्या मंदिराच्या तळघरात आहे हजारो किलो सोने !


भारतामध्ये आजच्या प्रगत काळामध्ये देखील अशी अनेक रहस्ये आहेत, ज्यांचा उलगडा आधुनिक विज्ञान देखील करू शकलेले नाही. केरळ मधील सुप्रसिध्द श्रीपद्मनाभ मंदिराची महती सर्वश्रुत आहे. ह्या मंदिराला सहा तळघरे असून ह्यातील प्रत्येक तळघरामध्ये अमाप संपत्ती असल्याची चर्चा अनेक वर्षे सुरु होती. त्यामुळे सहा पैकी पाच तळघरे जेव्हा उघडली गेली तेव्हा इथे उपस्थित असणारे सर्व आश्चर्याने थक्क राहिले. ह्या पाचही तळघरांमध्ये अनेक बहुमूल्य रत्ने, सोने, चांदी ह्यांची भांडारे सापडली. एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक मूल्याची ही संपत्ती असल्याचे बोलले जाते. ही पाच तळघरे उघडली गेली असली, तरी सहावे तळघर मात्र अजूनही बंदच आहे. ह्या सहाव्या तळघरामध्ये अमाप संपत्ती असल्याचे बोलले जाते. मात्र ह्या सहाव्या तळघराचा दरवाजा उघडून पाहण्याची हिम्मत आजवर कोणीही दाखवू शकले नाही. ह्या सहाव्या तळघराचे रहस्य नेमके आहे तरी काय, हे जाणून घेऊ या.

श्री पद्मनाभ स्वामी मंदिराच्या खाली असलेली ही तळघरे गेली अनेक शतके बंद होती. जेव्हा ह्या सहा पैकी पाच तळघरे उघडली गेली, तेव्हा येथे अलोट संपत्ती सापडली होती. ह्या येथे सोने, चांदी, मौल्यवान रत्नांच्या शिवाय अनेक प्राचीन मूर्ती देखील सापडल्या आहेत. पण सहाव्या तळघराचे गूढ मात्र आजही कायम आहे. कोणी कल्पनाही करू शकणार नाही इतकी संपत्ती ह्या सहाव्या तळघरात आहे अशी समजूत आहे. मात्र हे तळघर उघडण्याचे धैर्य आजवर कोणीही दाखविलेले नाही. ह्या तळघराला तीन दरवाजे असून, पहिला दरवाजा लोखंडाचा आहे. दुसरा भक्कम दरवाजा लाकडी असून, तिसरा आणि शेवटचा दरवाजा देखील भक्कम लोखंडाचा बनविलेला आहे.

ह्या दरवाज्यांवर कोणत्याही प्रकारची कडी किंवा कुलूप नाही. दरवाज्यांवर कोरलेल्या सर्पांच्या प्रतिमा, ह्या तळघराचे रक्षण करतात अशी समजूत आहे. तसेच एखाद्या तपस्व्याने ‘गरुड मंत्राचे’ उच्च्चारण केले असता, हा दरवाजा उघडेल असेही म्हटले जाते. पण जर ह्या मंत्राचे उच्चारण योग्य रीतीने केले गेले नाही, तर उच्चारण करणाऱ्याचा त्वरित मृत्यू होतो अशी येथे मान्यता आहे. हा दरवाजा उघडण्याच्या प्रयत्नात अनेकांना आपले प्राण गमवावे लागल्याचे बोलले जाते. ह्या संदर्भातील, १९३० साली एका स्थानिक वर्तमानपत्रामध्ये छापून आलेली हकीकत भयावह आहे. एमिली गिलख्रिस्ट हॅच ह्या लेखिकेच्या म्हणण्यानुसार १९०८ साली जेव्हा काही लोकांनी सहाव्या तळघरामध्ये शिरण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिथे त्यांना अनेक फणे असलेला महाकाय नाग दृष्टीस पडला. त्याचबरोबर अनेक लहान मोठे सर्प ह्या तळघरापाशी होते. तो महाकाय नाग बघून सहावे तळघर उघडण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांनी घाबरून जाऊन तेथून पलायन केले.

ह्या सहाव्या तळघराशी संबंधित एक कथा सांगितली जाते. असे म्हणतात, की सुमारे १३६ वर्षांपूर्वी, तिरुवनंतपुरम येथे भयंकर दुष्काळ पडला. तेव्हा मंदिराच्या कर्मचाऱ्यांनी हा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता, तळघराच्या आतून पाण्याचा अतिशय गतिमान प्रवाह वाहत असल्याचे आवाज कानी आले. हे ऐकून कर्मचाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचे प्रयत्न थांबविले. हे तळघर अरबी समुद्राशी जोडले गेले असल्याची देखील काहींची मान्यता आहे. त्यामुळे ह्या तळघराचा दरवाजा उघडला गेला, तर समुद्राचे पाणी तळघरामध्ये शिरून जलप्रलय येईल, आणि सर्व संपत्ती त्यामध्ये वाहून जाईल अशी ही मान्यता आहे.

Leave a Comment