ही संग्रहालये काही औरच..


मौल्यवान, दुर्मिळ वस्तूंचा, तैलचित्रांचा, त्याचप्रमाणे प्राचीन काळातील वस्तूंचा संग्रह पाहण्याकरिता आपण संग्रहालायांना भेटी देत असतो. संग्रहालय म्हटले, की प्राचीन काळातील भांडी, वस्तू, कपडे, शस्त्रास्त्रे, शिलालेख, राजे-राजवाड्यांच्या बैठका, इत्यादी संग्रह आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो. मात्र बेल्जियम मधील ‘ब्रुग’ ह्या ठिकाणी अशी संग्रहालये आहेत, जिथे संग्रही असलेल्या वस्तू काय आहेत हे कळल्यानंतर अप्रूप वाटल्यावाचून राहणार नाही.

चॉकोलेट हा पदार्थ बेल्जियन लोकांच्या अतिशय आवडीचा. त्यामुळे बेल्जियम मधील ब्रुग ह्या शहरातील ‘चॉको-स्टोरी’ हे संग्रहालय चॉकोलेटच्या इतिहासाला समर्पित आहे. ह्या संग्रहालयामध्ये अनेक दालने असून, ह्यापैकी प्रत्येक दालनामध्ये चॉकोलेट हे मूळचे कुठले, आणि ते जगप्रसिद्ध कसे झाले ह्याचा इतिहास चित्ररूपाने, लेखांच्या रूपाने पाहता येतो. ह्या ठिकाणी चॉकोलेट किंवा कोको बद्दल माहिती देणाऱ्या अनेक पुस्तकांनी भरलेली लायब्ररी असून, ह्या विषयी अधिक चर्चा करायची असल्यास ‘चॉकोलेट एक्स्पर्ट्स’ देखील ह्या संग्रहालयामध्ये उपस्थित असतात. इथून निघण्यापूर्वी तुमच्या आवडत्या चॉकोलेटची खरेदी तुम्हाला करायची असेल, तर ती सुविधाही येथे उपलब्ध आहे.

प्राचीन काळामध्ये कैद्यांवर अत्याचार करण्यासाठी ज्या वस्तू वापरल्या जात असत, त्यांचा संग्रह असलेले संग्रहालय ब्रुग येथे आहे. ह्या संग्रहालयाला ‘टॉर्चर म्युझियम’ असे नाव देण्यात आले आहे. इथे संग्रही असलेल्या वस्तू पाहून अंगावर भीतीने काटा आल्याशिवाय रहात नाही. एखाद्याला ‘टॉर्चर’ करण्यासाठी, म्हणजेच एखाद्याचा शारीरिक छळ करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अनेक वस्तू येथे ठेवल्या गेल्या आहेत. तसेच कोणकोणत्या प्रकारे एखाद्याचा शारीरिक छळ केला जात असे, ह्याची अस्वस्थ करणारी वर्णने करणारी पुस्तके येथे आहेत.

‘बृगस् बियर एक्सपीरीयंस’ हे संग्रहालय नावाप्रमाणे अर्थातच बियरला समर्पित आहे. येथे बियरचा इतिहास जाणून घेण्याची संधी तुम्हाला मिळते, म्हणजेच बियर सर्वप्रथम कुठे आणि कशी तयार केली गेली, तसेच आजच्या काळामध्ये उपलब्ध असलेल्या अनेक तऱ्हेच्या बियर्स बद्दल जाणून घ्यायचे असेल, आणि त्याबरोबर ह्या तऱ्हा चाखूनही पहायच्या असतील तर ह्या संग्रहालयाला अवश्य भेट द्यावी. बटाटा आपल्या खान-पानामध्ये कसा समाविष्ट झाला, तसेच बटाट्याचा उपयोग निरनिरळ्या पदार्थांसमवेत कधी आणि कसा सुरु झाला, आणि लहान मुलांच्या खास पसंतीच्या असणाऱ्या ‘फ्रेंच फ्राईज’ नेमक्या कश्या अस्तित्वात आल्या हे जाणून घ्यायचे असेल तर ब्रुग येथील ‘फ्राईज म्युझियम’ ला अवश्य भेट देता येईल.

बेल्जियम शिवाय अन्य काही देशांमध्ये ही ‘हटके’ संग्रहालये आहेत. इटली मधील एमिलीया बोलोना येथे असलेल्या ‘जेलाटो म्युझियम’मध्ये हर तऱ्हेची जेलाटो, किंवा जेलो उपलब्ध आहेत. तसेच इच्छुक जेलो प्रेमींना येथे जेलो किंवा जेलाटो बनविण्याचे धडेही दिले जातात. त्याचबरोबर ह्या संग्रहालयाबद्दल माहिती देण्यासाठी गाईड्स उपलब्ध असून, तऱ्हे-तऱ्हेचे जेलाटो चाखून पाहण्याची संधीही येथे मिळते. इटलीप्रमाणेच अमेरिकेतील मायामी येथे बर्गर म्युझियम आहे. ह्या ठिकाणी बर्गर्सच्या जुन्या काळतील मोठमोठ्या जाहिराती, बर्गर्सचा इतिहास इत्यादी माहिती दर्शविणाऱ्या वस्तूंचा संग्रह आहे.

Leave a Comment