इंग्रजीमध्ये शपथ घेतल्याबद्दल मंत्र्यांकडून क्षमायाचना


कर्नाटकात नव्याने नियुक्त झालेल्या मंत्र्यांनी आपल्या पदाची शपथ इंग्रजीतून घेतल्याबद्दल राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री झमीर अहमद यांनी शनिवारी लोकांची जाहीर माफी मागितली.

सिद्द्गंगा येथील संत शिवकुमार स्वामी यांचा आशीर्वाद घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही क्षमायाचना केली.

“कन्नडीगांच्या भावना दुखावल्याबद्दल मला अतिशय खेद आहे. माझ्या आईवडिलांनी मला इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाठवले. म्हणूनच मी कन्नड भाषेत बोलू शकत नाही आणि शपथ घेताना चूक करण्याची माझी इच्छा नव्हती,” असे ते म्हणाले.

“मंत्री पदाच्या बाबतीत मी एक नवशिक्या आहे. मला जबाबदारी घेण्यास दोन दिवस लागतीतल. माझ्याकडे सोपवलेली कामगिरी मी करीन,” असेही ते म्हणाले.

झमीर हे काँग्रेस पक्षाचे आमदार असून त्यांना मंत्रिमंडळात घेण्याबद्दल एच. डी. देवेगौडा नाखुश होते. याबाबत विचारलेल्या
प्रश्नावर झमीर म्हणाले, आमचे आघाडी सरकार आहेत. माजी पंतप्रधान एच. डी. देवगौडा यांच्या शिफारशी घेण्यास काहीच हरकत नाही. काँग्रेसच्या खातेवाटपात कुमारस्वामी यांनी हस्तक्षेप केलेला नाही.”