ब्रिटीश शाही परिवाराच्या मिळकतीची साधने नेमकी कोणती?


प्रिन्स हॅरी आणि मेघन मार्कल ह्यांचा शाही विवाहसोहोळा नुकताच विंडसर कासल येथे दिमाखात पार पडला. शाही इतमामाला साजेल अश्या ह्या सोहोळ्यासाठी भरपूर खर्च करण्यात आला होता. हा विवाहसोहोळा तब्बल तीन दिवस चालला. ह्या सोहोळ्यासाठी पैसा खर्च करण्यासाठी तितका आणि त्याही पेक्षा कितीतरी पटीने जास्त पैसा शाही परिवाराकडे आहे हे सत्य जगजाहीर आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट अशी, की शाही परिवारातील कोणीही सदस्य आर्थिक उत्पन्न मिळविण्याकरिता नोकरी किंवा व्यवसाय करीत नसताना, त्यांच्या मिळकतीची साधने नेमकी आहेत तरी कोणती? शाही परिवाराच्या मालकीची संपत्ती नेमकी आहे तरी किती?

‘रीडर्स डायजेस्ट’ ने पुरविलेल्या माहितीनुसार शाही परिवारातील प्रत्येक सदस्याच्या मालकीची संपत्ती ह्याप्रमाणे- राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप ह्यांच्या मालकीच्या संपत्तीची किंमत ३० मिलियन डॉलर्स, म्हणजेच २०० कोटींची आहे, तर प्रिन्स विलियम आणि प्रिन्स हॅरी ह्यांच्या मालकीच्या संपत्तीची किंमत प्रत्येकी ४० मिलियन डॉलर्स, म्हणजेच सुमारे २७७ कोटी रुपये इतकी आहे. ब्रिटनचे युवराज प्रिन्स चार्ल्स ह्यांच्या मालकीच्या संपत्तीची किंमत १०० मिलियन डॉलर्स, म्हणजे ६७० कोटी रुपये असून, खुद्द राणी एलिझाबेथच्या मालकीची संपत्ती ५५० मिलियन डॉलर्स, म्हणजे ३३६८ कोटी रुपयांची आहे. त्यामुळे सर्व परिवाराची एकत्रित संपत्ती पाहता ह्याची किंमत तब्बल ७६० मिलियन डॉलर्स, म्हणजेच ५०८५ कोटी रुपये इतकी आहे.

शाही परिवारातील सदस्यांना दर महिन्याला तथाकथित ‘पगार’ मिळत नसला, तरी क्राऊन इस्टेट तर्फे शाही परिवाराला दर वर्षी ‘ग्रांट’, म्हणजेच निधी दिला जातो. २०१८-१९ ह्या आर्थिक वर्षामध्ये शाही परिवाराला ६४७ कोटी रुपये निधी मिळणे अपेक्षित आहे. तसेच राणी एलिझाबेथ हीची स्वतःची खासगी मिळकत असून ह्याला ‘प्रिव्ही पर्स’ म्हटले जाते. राणीच्या मालकीच्या ४५,६०० एकर जमिनीतून आलेले उत्पन्न ह्या प्रिव्ही पर्स मध्ये जमा होत असते. ह्या जमिनी शेतीसाठी, किंवा अन्य व्यवसायांसाठी, आणि निवासासाठी भाडेकरारावर देण्यात आल्या आहेत. तसेच संपूर्ण युनायटेड किंग्डम मध्ये नैसर्गिक रीत्या तयार होणारे सोने आणि चांदी ही राणीच्या अधिपत्याखाली आहे.

ब्रिटनमधील प्रसिद्ध अॅस्कॉट रेसकोर्स राणी एलीझाबेथच्या मालकीचे असून, त्याद्वारे दर वर्षी सुमारे ४० कोटी रुपयांची मिळकत होत असते. तसेच राणी एलिझाबेथच्या नावे अनेक ब्ल्यू चिप ब्रिटीश कंपन्यांमध्ये आर्थिक गुंतवणुकी केल्या गेल्या असून ह्यांची किंमत ८६६ कोटी रुपयांच्या घरात आहे. इंग्लंड, वेल्स, आणि आयर्लंडचे ५०% सागरी किनारे, ग्रामीण भाग आणि शेतजमीन शाही परिवाराच्या मालकीची आहे. ह्यातून क्राऊन इस्टेटला दर वर्षी सुमारे ३८६ कोटी रुपयांची मिळकत होते. तसेच क्राऊन इस्टेट अंतर्गत बकिंगहॅम पॅलेस, विंडसर कासल, हॉलीरूडहाउस पॅलेस, हिल्सबोरो कासल, क्लॅरेंस हाउस, केन्सिंगटन पॅलेस, द रॉयल लॉज, सेंट जेम्स पॅलेस, बॅगशॉट पार्क, बार्नवेल मेनर, रेन हाउस, आणि थॅच्ड हाउस लॉज ही सर्व निवासस्थाने शाही परिवाराच्या अधिपत्याखाली असून ह्यांची विक्री करण्याचे अधिकार शाही परिवाराला नाहीत. मात्र शाही सदस्यांची खासगी मालमत्ता असेलली निवासस्थाने विकण्याचा अधिकार शाही परिवाराला आहे. ह्यामध्ये सँड्रीन्गहॅम हाउस, बाल्मोरल कासल, क्रेगोवॅन लॉज, डेल्नाडॅम्फ लॉज, हायग्रोव्ह हाउस, बर्कहॉल, अॅनमर हॉल इत्यादी निवासस्थानांचा समावेश आहे.

शाही परिवाराच्या मालकीच्या आभूषणांची, रत्नांची किंमत कल्पनेच्या ही पलीकडे आहे, कारण आजवर ह्या आभूषणांचे मूल्यमापन कधीही केले गेलेले नाही. ह्या आभूषणांमध्ये अनेक मुकुट, रत्नजडीत हत्यारे, आणि अनेक मौल्यवान रत्नांचा समावेश आहे. ह्या सर्व आभूषणांची किंमत अंदाजे ४५०० कोटी रुपयांच्या घरात असल्याचे बोलले जाते. तसेच राणीचा खासगी स्टँप संग्रह देखील ७८७ कोटी रुपये मूल्याचा असल्याचे समजते. तसेच, लंडन शहरातील सुमारे १२.७ बिलियन पाउंड्स इतक्या किंमतीची मालमत्ता शाही परिवाराच्या मालकीची आहे.