हे आहे युरोपमधील अंडर-वॉटर रेस्टॉरंट


समुद्रातील शार्क्सच्या आणि त्याचबरोबर अनेक चित्रविचित्र जलचरांच्या सान्निध्यात बसून आरामात जेवण घेण्याची कल्पना तुम्हाला कशी वाटते? २०१९ साली युरोपमध्ये सुरु होत असलेल्या अंडर-वॉटर रेस्टॉरंटमुळे ही कल्पना प्रत्यक्षात उतरणार आहे. नॉर्वेजियन समुद्राच्या खाली हे नवे रेस्टॉरंट बांधण्यात आले आहे. नॉर्वेची राजधानी असलेल्या ओस्लो शहरापासून काही अंतरावर असलेल्या लिन्डेसनेस ह्या गावामध्ये हे रेस्टॉरंट बनविण्यात आले आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये एका वेळी शंभर पाहुण्यांना भोजनाचा आनंद घेता येणार आहे.

‘स्नोहेता’ नामक आर्कीटेक्चर फर्मने ह्या रेस्टॉरंटचे डिझाईन तयार केले असून, पुढील वर्षीच्या मार्च महिन्यामध्ये हे रेस्टॉरंट ग्राहकांसाठी खुले होणे अपेक्षित आहे. ह्या रेस्टॉरंटच्या निर्मितीमध्ये सहा लाख डॉलर्स खर्च झाले असून, येथे येणाऱ्या पाहुणे मंडळींना येथील मेन्यू पसंत पडावा ह्यासाठी हर तऱ्हेचे पदार्थ येथे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे पदार्थ तयार करण्यासाठी नामवंत शेफ्सची गलेलठ्ठ पगारावर नेमणूकही करण्यात आली आहे. ह्या पदार्थांमध्ये विदेशी पदार्थांबरोबरच स्थानीय पदार्थांचाही समावेश असणार आहे.

ज्या पाहुण्यांना समुद्राच्या पाण्याखाली जाण्याची भीती असेल, त्यांच्या साठी समुद्र सपाटीच्या वर शँपेन बार बनविण्यात आला आहे. ह्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन समुद्राखाली भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी पाहुणे मंडळींना आणखी थोडी वाट पहावी लागणार असली, तरी एकदा हे रेस्टॉरंट सुरु झाले की त्यापुढे सहा महिने तरी येथील बुकिंग ‘फुल’ असतील अशी रेस्टॉरंट व्यवस्थापनाची खात्री आहे.

Leave a Comment