‘चाय पे चर्चा’.. ही गोष्ट चहाची.


आपल्यासाठी चहा हे केवळ एक पेय नाही. अनेकांसाठी चहा हा घडाळ्याच्या सकाळच्या गजराइतकाच आवश्यक असतो. ह्या पेयाचे शौकीन घरा-घरात सापडतात. अगदी मोठमोठ्या हॉटेल्स पासून ते नाक्यावरील चहाच्या टपरीपाशी चहा पिणाऱ्यांची वर्दळ दिवसा आणि रात्री देखील कुठल्याही वेळेला दिसतेच. ह्या पेयाशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही, आणि गप्पांचे अड्डे देखील रंगत नाहीत. इतकेच काय, तर आपले माननीय प्रधानमंत्री देखील ‘चायपे चर्चा’ करण्याच्या निमित्ताने जनतेशी संवाद साधतात. चहा हे मूळचे भारतीय पेय नाही. पण ते आपल्याकडे कुठून आले, आणि आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग कसे बनले, ह्याची कहाणी मोठी रोचक आहे.

ज्या पेयाच्या सेवानाशिवाय डोळ्यांवरील झोप उडत नाही, शरीराची मरगळ जाऊन शरीरात चैतन्य निर्माण होत नाही, असा हा चहा, सुमारे शंभर वर्षांपूर्वी फारच कमी भारतीयांच्या परिचयाचा आणि सवयीचा होता. भारतामध्ये काही ठिकाणी चहा होत असे, पण त्याचे सेवन काही आदिवासी जमाती करीत असत, किंवा औषधी म्हणून त्याचा वापर केला जात असे. ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आपले पाय रोवू लागल्यानंतर आर्थिक उत्पन्नाच्या दृष्टीने निर्यात करता येईल असे एखादे पीक भारतामध्ये करावे अशी त्यांची योजना होती. त्यानुसार कोणत्या पिकाची लागवड करता येईल ह्या दृष्टीने विचार सुरु असता, ब्रिटीश वनस्पतीतज्ञ सर जोसेफ बँक्स ह्यांनी भारताच्या उत्तर-पूर्वी भागामध्ये हवामान चहाच्या लागवडीसाठी योग्य असल्याने, तिथे चहाची लागवड केली जावी असे सुचविले. त्या काळी इंग्लंडमध्ये चहाला मोठी मागणी होती. पण चहाची लागवड चीन मध्ये मोठ्या प्रमाणात होत असे, आणि त्याबाबतीत ब्रिटीशांचीच तिथे मक्तेदारी असल्याने, इतरत्र कुठे चहाची लागवड करण्याची गरज त्या काळी भासली नाही.

मात्र १८३३ सालच्या सुमारास ब्रिटीशांची चीनमधील मक्तेदारी संपुष्टात आली. त्याकाळी चहाला इंग्लंडमध्ये मोठी मागणी असल्यामुळे इतरत्र कुठेतरी चहाची लागवड सुरु करण्याची आवश्यकता प्रकर्षाने निर्माण झाली. तेव्हा १८३६ साली चहाची लागवड प्रथम भारतामध्ये सुरु झाली. पण तरीही चहा हा सर्वसामान्यांपासून तेव्हाही लांबच होता. केवळ ब्रिटीश आणि त्यांच्या सतत संपर्कात असलेल्यांना चहा माहित होता. ह्याचे मुख्य कारण असे, चहा हा पदार्थ मुख्यत्वे निर्यातीच्या उद्देशाने होत होता. त्यामुळे स्थानिक बाजारपेठांमध्ये हा पदार्थ सर्व सामान्यांकरिता उपलब्ध नसे. पण कालांतराने, निर्यात करण्याबरोबरच स्थानिक बाजापेठेमध्ये जर हा पदार्थ उपलब्ध केला गेला तर दुहेरी फायदा होईल हे ब्रिटीशांच्या लक्षात आल्याने त्यांनी सर्वप्रथम ‘पैसा पॅकेट’ बाजारामध्ये आणले. ह्या पॅकेटमध्ये पाच कप चहा होईल इतपत चहाची पूड असून ह्याची किंमत सर्व सामान्यांना परवडण्याइतपत, केवळ एक पैसा इतकी होती. पण ही योजना सपशेल फसली आणि सर्वसामान्य जनतेने चहाला पसंती दिली नाही. किंबहुना चहा हे उत्तेजक पेय आहे अशी समजूत असल्याने चहा पिणाऱ्याला इतरांचा रोष पत्करावा लागत असे.

त्यानंतर सामान्यांपर्यंत चहा पोहोचवायचाच असा निर्धार करून इस्ट इंडिया कंपनीनेही कसोशीने प्रयत्न सुरु केले. त्यासाठी त्यांनी तत्कालीन मोठ्या शहरांपासून सुरुवात केली. ह्या शहरांमधील सार्वजनिक ठिकाणे, सिनेमागृहे, नाट्यगृहे, मोठमोठ्या कारखान्यांची कँटीन्स, रेल्वे आणि बस स्थानके अश्या सर्व ठीकाणी चहा उपलब्ध केला गेला. इतकेच काय, तर घराघरामध्ये जाऊन चहाची जाहिरात करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले. अश्या रितीने हळू हळू चहा घरा-घरात सवयीचा होऊन गेला. आजच्या काळामध्ये आपल्या खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग बनलेला हा चहा, ब्रिटीश पीत असत तसा ‘इंग्लिश टी’ नसून, ह्या चहाने कधी आले, कधी वेलची, तर कधी अनेक मसाल्यांच्या मदतीने अस्सल भारतीय साज ल्यायला आहे.

Leave a Comment