चला सुगंधाच्या दुनियेत.. जाणून घ्या परफ्युम्स विषयी..


परफ्युम हा शब्द लॅटीन भाषेतील ‘पर फुमस’ ह्या शब्दापासून आलेला आहे. ह्याचा शब्दशः अर्थ धुरातून प्रकटलेला असा होतो. परफ्युमच्या बाबतीत बोलायचे झाले, तर तो स्प्रे केल्यानंतर त्यातून उत्पन्न होणाऱ्या ‘फ्युम्स’ किंवा हलक्या धुरामुळे परफ्युमचा सुगंध खऱ्या अर्थाने आपल्यापर्यंत पोहोचतो. ह्या सुगंधाने मन प्रफुल्लीत होते, मनावरील ताण हलका होतो, आसपासचे वातावरणही प्रसन्न भासू लागते. परफ्युम बनविण्याची कला फार प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. प्राचीन ग्रीक, अरब, चायनीज आणि भारतीय संस्कृतींमध्ये परफ्युम्स किंवा अत्तरे बनविण्याची पद्धत होती. ख्रिस्तपूर्व १२०० सालापासून परफ्युम बनविले जात आले आहे. ह्याबद्दलचे उल्लेख अनेक शिलालेखांमध्ये सापडले आहेत. भारतात ही कला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. चरक संहिता, सुश्रुत संहिता ह्या प्राचीन ग्रंथामध्येही अत्तरे बनविण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर उल्लेख आहेत.

अरबी आणि पर्शियन लोकांनी अत्तरे सर्व प्रथम तयार केली असून, युरोपमध्ये अत्तरे चौदाव्या दशकामध्ये आली. हंगेरियन लोकांनी पहिल्यांदा सुवासिक अत्तरे अल्कोहोल सोबत वापरून पाहण्याचा प्रयोग केला आणि त्यावरूनच परफ्युम्स बनविण्याची आताची आधुनिक पद्धत अस्तित्वात आली. परफ्युम बनविण्यासाठी सर्वप्रथम नैसर्गिक फुले, फळे किंवा पानांपासून तेल काढले जाते. त्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करून, कंपनी तर्फे तयार केलेल्या विशिष्ट रासायनिक फॉर्म्युला मध्ये ही तेले मिसळली जातात. एकदा हवा तसा सुगंध तयार झाला, की त्यामध्ये ठराविक मात्रेमध्ये अल्कोहोल आणि पाणी मिसळले जाते. परफ्युम्सचे ही काहीसे वाईन सारखेच असते. वाईन जितकी जुनी तितकी जास्त मूल्यवान, त्याचप्रमाणे मौल्यवान परफ्युम्सही काही काळाकरिता साठविली जातात. अनेक नामांकित मौल्यवान परफ्युम्स काही वर्षे साठवून ठेवल्यानंतर मग बाटल्यांमध्ये भरून विकली जातात.

परफ्युम्स अनेक प्रकारची असतात. काही परफ्युम्सना फुलांचा सुगंध असतो, तर काही परफ्युम्स ताज्या, विशेषतः संत्री, लिंबू, स्ट्रॉबेरीज, पीच असल्या फळांपासून बनविली जातात. काही परफ्युम्सचा सुगंध उदबत्त्यांच्या सुगंधाप्रमाणे असतो. ह्यामध्ये चंदन इत्यादी सुगंधांचा समावेश आहे, तर काही परफ्युम्स अनेक सुगंधी झाडांच्या खोडांपासून तयार केली जातात. ह्यांना ‘वूडी’ परफ्युम्स म्हटले जाते. परफ्युम निवडताना प्रत्येक व्यक्तीची खास पसंती पाहायला मिळते. कोणाला सुगंध आवडतो, तर कोणाला पॅकेजिंग आवडते, तर काहींना त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटीज एक विशिष्ट परफ्युम वापरतात, म्हणून ते वापरायला आवडते. पण परफ्युमची निवड काळजीपूर्वक करावी. एकच परफ्युम दोन वेगळ्या व्यक्तींवर स्प्रे केले असता, त्याचा गंध वेगळा येऊ शकतो. आपल्या त्वचेची रासायनिक घडण, आपण घेत असलेला आहार, आणि आपल्या आसपासचे पर्यावरण ही त्यामागील कारणे आहेत. त्यामुळे परफ्युम निवडताना ते स्प्रे करून एक तास राहू द्यावे. तसेच एकाच वेळी तीनचार परफ्युम्स स्प्रे करण्याचे टाळावे. तासाभरानंतर परफ्युमचा सुगंध कसा वाटतो आहे हे पाहून मगच निवड करावी.

Leave a Comment