आयपीएस अधिकारी देत आहे विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण


एकीकडे समाजकंटकांपासून जनतेचे रक्षण करण्याची मोलाची कामगिरी पार पाडत असताना, दुसरीकडे जम्मू ( दक्षिण भाग) चे एसपी असलेले संदीप चौधरी, ‘यूपीएसई’ च्या स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दीडशे विध्यार्थ्यांना प्रशिक्षण देत आहेत. त्याचप्रमाणे स्टाफ सिलेक्शन कमिशन, बँकिंग आणि जम्मू काश्मीर पोलीस दलामध्ये भरती होण्याकरिता द्याव्या लागणाऱ्या परीक्षांसाठी देखील श्री चौधरी विद्यार्थांना मार्गदर्शन करीत आहेत. विशेष गोष्ट ही की ह्या प्रशिक्षणाच्या बदल्यात श्री चौधरी कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाहीत.

जम्मू काश्मीर ह्या राज्यामध्ये खासगी व्यवसायांमध्ये नोकरी करण्यासाठी फारसा वाव नाही, त्यामुळे चांगली नोकरी मिळवायची असेल, तर येथील तरूण वर्ग दिल्ली, मुंबई, सारख्या मोठ्या शहरांमध्ये स्थलांतरित होतो. पण ज्यांना येथेच नोकरी करायची असते, त्यांना मात्र सरकारी नोकरीमध्ये भरती होणे हा चांगला पर्याय असतो. पण त्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळण्याची आवश्यकता असते. अनेकदा असे ही घडते, की प्रशिक्षण केंद्रे उपलब्ध असतात, पण त्यांची फी भरण्याइतकी ऐपत नसते. अश्यावेळी गुणवत्ता असून देखील पैशांच्या अभावी अनेक तरुण मंडळींना प्रशिक्षण घेता येणे शक्य होत नाही.
अशाच तरुण-तरुणींकरिता श्री चौधरी ह्यांनी मदतीचा हात पुढे केला, आणि त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला श्री चौधरी ह्यांच्याकडे जम्मू काश्मीर पोलीस दलामध्ये भरती होण्याची इच्छा असणारे दहा विद्यार्थी होते. त्यासाठी चौधरी त्यांना प्रशिक्षण देत होते. कालांतराने श्री चौधरी ह्यांनी राज्यसेवा स्पर्धा परीक्षा, बँकिंग इत्यादी परीक्षा देण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. आजच्या तारखेला श्री चौधरी दीडशे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. श्री चौधरी ह्यांच्या ड्युटीच्या वेळेआधी, सकाळी लवकरच्या वेळामध्ये हे प्रशिक्षण वर्ग भरत असतात.