तब्बल १०३ वर्षांनतर सापडली पहिल्या महायुद्धाच्या काळातील पाणबुडी.


१४ सप्टेंबर १९१४ साली ऑस्ट्रेलियन नौदलातील ‘एई १’ ही पाणबुडी अचानक गायब झाली. पुष्कळ शोध घेऊनही ह्या पाणबुडीचा काहीच थांगपत्ता लागला नव्हता. ही घटना घडून गेल्याच्या अनेक दशकांच्या नंतर, २०१७ साली ही पाणबुडी पापुआ न्यू गिनी देशाच्या नजीक, ड्युक ऑफ यॉर्क आयलंड्सच्या किनारपट्टीपासून काही अंतरावर सापडली. इतकी पुरातन, प्रथम महायुद्धाच्या काळातील पाणबुडी सापडली हे समजताच तिथे येऊ पाहणाऱ्या हौशी पर्यटक, तथाकथित इतिहासकार, किंवा अभ्यासक मंडळींचा ससेमिरा चुकविण्यासाठी, ही पाणबुडी जिथे सापडली ते नेमके ठिकाण उघड करण्यात आलेले नाही.

ऑस्ट्रेलियन सरकारच्या वतीने रियर अॅडमिरल पीटर ब्रिग्स ह्यांच्या नेतृत्वाखाली, ही पाणबुडी शोधून काढण्यासाठी एका दलाचे गठन करण्यात आले होते. अत्याधुनिक अंडर-वॉटर स्कॅनिंग तंत्रज्ञानाच्या मदतीने ह्या पाणबुडीचे अवशेष शोधून काढण्यात ह्या दलाला यश आले. ह्या पाणबुडीचे अवशेष सापडल्यानंतर ह्या अवशेषांची, अंडर वॉटर कॅमेराज् च्या मदतीने छायाचित्रेही घेण्यात आली. रियर अॅडमिरल ब्रिग्स हे सबमरीन इंस्टीट्युट ऑफ ऑस्ट्रेलियाचे चे अध्यक्ष असून, पाणबुडी आणि त्यातील तंत्रज्ञान ह्यामध्ये त्यांचा विशेष अभ्यास आहे. त्यांच्या मते, ही पाणबुडी अचानक अतिशय तीव्र झटक्याने बुडाली असावी, आणि त्यानंतर त्यामध्ये असलेल्या आठ टॉर्पिडो पैकी एकाचा स्फोट झाला असावा. या अपघातामुळे ह्या पाणबुडीमध्ये असलेले ३५ कर्मचारी स्फोटामध्ये मृत्युमुखी पडले असावेत असा अंदाज ब्रिग्स ह्यांनी व्यक्त केला आहे.

जेव्हा पहिले महायुद्ध सुरु झाले, तेव्हा जर्मन सैन्याच्या ताब्यात असलेल्या न्यू गिनी आयलंड्स वर ताबा मिळविण्याची कामगिरी ह्या पाणबुडीवर सोपविण्यात आली होती. त्याप्रमाणे ही कामगिरी यशस्वी रित्या पार पाडून, ही पाणबुडी सेंट जॉर्जेस चॅनेलकडे, पॅट्रोलिंग करण्यास जाणे अपेक्षित होते. मात्र तिथे पोहोचण्यापूर्वीच ही पाणबुडी गायब झाली. त्यानंतर पुढील तीन दिवस ह्या पाणबुडीचा कसून शोध घेण्यात आला, पण त्यामध्ये काही निष्पन्न झाले नाही. त्यानंतर ह्या पाणबुडीचे आणि त्यावरील कर्मचाऱ्यांचे नेमके काय झाले, हे मोठे रहस्य होऊन बसले होते.

Leave a Comment