ही आहेत काळाच्या ओघात विस्मृतीत गेलेली काही ठिकाणे.

प्राचीन काळामध्ये अतिशय संपन्न असलेली, अनेक संस्कृतींचा वारसा लाभलेली, अनेक सत्तांचे उदय आणि अस्त पाहिलेली अनेक ठिकाणे भारतामध्ये होऊन गेली आहेत. मात्र काळाच्या ओघामध्ये ह्या ठिकाणांचे महत्व कमी होत गेले आणि ही ठिकाणे विस्मृतीत गेली. ग्रीक, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृती ह्या मनुष्याला ज्ञात असलेल्या प्राचीनतम संस्कृती आहेत. ह्या संस्कृती ज्या काळामध्ये अस्तित्वात होत्या त्या काळी त्या संस्कृतींमध्ये जगत असलेले लोक, त्याही काळामध्ये अतिशय प्रगत असल्याचे पुरावे वेळोवेळी मिळाले आहेत. भारतामध्ये देखील ह्या प्राचीन संस्कृतीचे अंश अनेक ठिकाणी सापडले आहेत. गेल्या शतकामध्ये ही ठिकाणे नव्याने उजागर झाली आहेत, आणि त्यांच्यासोबत ह्या ठिकाणांशी निगडीत अनेक कथा ही पुन्हा एकदा प्रकाशात आल्या आहेत.

‘काळ्या बांगड्या’ ह्या अर्थाचे नाव असलेले शहर- कालीबंगान. राजस्थानातील हनुमानगडमध्ये सरस्वती नदीच्या काठी वसलेले हे गाव. त्याकाळी राजस्थान हे व्यावसायिक दृष्ट्या अतिशय संपन्न क्षेत्र होते. इंडस व्हॅली संस्कृतीची राजधानी समजले जाणारे कालीबंगान हे गाव, व्यवसायाच्या दृष्टीने महत्वाचे केंद्र होते. टेराकोटाच्या विविध वस्तू, अतिशय आखीव रस्ते, आणि भक्कम घरे ह्या गावाचे वैशिष्ट्य आहेत. ख्रिस्तपूर्व ३७०० साली वसलेले हे गाव ख्रिस्तपूर्व १७५० साली उजाड झाले. त्यानंतर १९०० सालच्या सुमाराला ह्या गावाचा शोध लागला. आता ह्या ठिकाणी, येथील संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या अनेक वस्तू येथील संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. येथे फिरून, पुरातत्ववेत्त्यांच्या सहाय्याने येथील नगराची रचना, त्या काळी अस्तित्वात असलेले स्थापत्यशास्त्र, वापरात असणाऱ्या वस्तू, दफनभूमी, इत्यादी गोष्टी पाहता येऊ शकतात. बिकानेर शहरापासून २०५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण आहे.

‘लोथल’ ह्या शब्दाचा स्थानिक बोली भाषेतील अर्थ खरे तर ‘मृतदेहांचा ढीग’ असा आहे. हे ठिकाण गुजरातेतील अहमदाबाद जिल्ह्यामध्ये आहे. ख्रिस्तपूर्व ३७०० वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या ह्या गावामध्ये त्याकाळीही सांडपाणी वाहून नेण्याची उत्तम व्यवस्था केलेली होती. त्यानंतर ख्रिस्तपूर्व १९०० सालच्या दरम्यान हे गाव पुरामुळे जमीनदोस्त झाले. येथील संस्कृतीचे अवशेष १९५४ साली सापडले असून, ह्या वस्तूंचे संग्रहालय येथे आहे. कच्च्छच्या रणामध्ये असलेले ढोलावीरा हे शहर इंडस संस्कृतीतील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक होते. स्थानिक भाषेमध्ये कोटाडा टिंबा ह्या नावाने ओळखले जाणारे हे शहर आता भग्न अवस्थेत पाहायला मिळते. येथे झालेल्या खोदकामातून हडप्पा संस्कृतीमधील जीवन कसे असावे हे दर्शविणाऱ्या अनेक वस्तू सापडल्या आहेत. हे गाव ख्रिस्तपूर्व २६५० सालामध्ये अस्तिवात असून, ख्रिस्तपूर्व १४५० साली हे गाव संपूर्णपणे नष्ट झाले. त्यानंतर १९६७ सालच्या उत्खननामध्ये ह्याचे अवशेष सापडले.

Leave a Comment