अवघ्या एका दिवसातच फिरून पाहता येतील ही देश.

परदेशी सुट्टीवर जाण्याचा बेत असला, तर त्या देशामध्ये असलेली सर्व प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचा आपला विचार असतो. आता इतकी प्रेक्षणीय स्थळे पहायची तर त्यासाठी वेळ हवाच. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करायचा, तेथे असलेल्या पर्यटनस्थळांना भेटी द्यायच्या, जमेल तशी खरेदीही करायची, हे सर्व करायचे म्हणजे किमान आठ दहा दिवसांचा अवधी हवाच. पण काही देश असे ही आहेत जे फिरून पाहण्याकरिता केवळ एका दिवसाचा अवधी देखील पुरसा आहे. विशेषतः ज्यांना भटकंतीची आवड आहे, पण त्यासाठी आवश्यक तेवढा वेळ ज्यांच्याकडे नाही, त्यांच्यासाठी ह्या देशांना भेटी देणे हा चांगला पर्याय आहे.

ग्रेनाडा हा लहानसा देश एक द्वीप असून, दक्षिण-पूर्व कॅरीबियन समुद्रामध्ये हे लहानसे द्वीप आहे. ह्या द्वीपावर जायफळाची पैदास मोठ्या प्रमाणात होत असल्यामूळे ह्या बेटाला ‘ स्पाइस आयलंड ‘ ह्या नावाने ही ओळखले जाते. ह्या बेटाचा विस्तार ३४४ स्क्वेअर किलोमीटर असून, येथील समुद्रकिनारे अतिशय स्वच्छ, पर्यटकांच्या गर्दीपासून, कोलाहलापासून मुक्त असलेले आहेत. येथील समुद्रात कोरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. येथे अंडर वॉटर स्कल्प्चर पार्क असून, लेवेरा अभयारण्य, आणि तीन लहानसे ऐतिहासिक किल्ले येथील खासियत आहेत.

मेडीटेरेनियन समुद्राच्या मध्यावर, गोझो, कॉमिनो, आणि माल्टा ह्या तीन बेटांना मिळून माल्टा हा देश बनलेला आहे. सुंदर सागरी किनारे, आणि सात हजार वर्षांचा इतिहास असलेला हा देश आहे. येथे प्राचीन कालीन म्नाज्द्रा आणि हागर किम ही मंदिरे आहेत. तसेच अनेक नाईटक्लब्सही ह्या बेटांवर आहेत. मध्य युरोपमध्ये असलेला लीश्टेनस्टाईन नामक लहानसा देश केवळ १६० स्क्वेअर किलोमीटर विस्ताराचा आहे. स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रीया ह्या दोन सुंदर देशांच्या मध्ये असलेला हा चिमुकला देश आहे. पण ह्या देशामध्ये आंतरराष्ट्रीय हवाईपत्तन नसल्याने स्वित्झर्लंडमधील झ्युरिकच्या मार्गे ह्या देशामध्ये जावे लागते. येथे असणारे संग्रहालय, अनेक हायकिंग ट्रेल्स, आणि गुटेनबर्ग कासल येथील प्रमुख आकर्षण आहेत.

सॅन मारिनो हा लहानसा देश इटली नजीक आहे. इतिहासामध्ये रुची असणाऱ्यांना किंवा निसर्गप्रेमी लोकांना येथे खूप काही पहावयास मिळते. येथे असणारे ‘विंटेज’ कार्सचे संग्रहालय येथील प्रमुख आकर्षण आहे. तसेच ‘टोर गुआइटा’ नामक प्राचीन किल्लाही येथे आहे. न्यूयॉर्क शहरातील सेन्ट्रल पार्कच्या एक अष्टमांश भागात बसेल इतका लहानसा देश म्हणजे व्हॅटीकन सिटी. पण हा देश सर्वात लहान असला, तरी दरवर्षी येथे लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. ह्याचे कारण, ख्रिस्त धर्माचे सर्वोच्च श्रद्धास्थान आणि धर्मगुरू, म्हणजेच ‘पोप’ ह्यांचे निवासस्थान येथे आहे. अनेक भव्य, प्राचीन इमारतींनी नटलेला हा देश आहे, येथील संग्रहालायांमध्ये जगातील नामांकित, बहुमूल्य पेंटींग्ज आहेत. येथील सेंट पीटर्स बॅसिलिका, सिस्टीन चॅपल, सेंट पीटर्स स्क्वेअर आणि त्याचबरोबर अनेक नामाकीत संग्रहालये येथील प्रमुख आकर्षण आहेत.

Leave a Comment