फिल्टरचा वापर न करता देखील असे शुध्द करा पिण्याचे पाणी.


‘जल जीवन आहे’, ही शिकवण देत, पाण्याचे महत्व अगदी लहानपणापासून आपल्या मनावर बिंबविले जात असते. शरीराचे, त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यासाठी दररोज किमान दोन ते तीन लिटर पाणी पिणे आवश्यक असल्याचेही आपण ऐकतो. पण आपण जे पाणी पितो ते शुद्ध नसेल, तर तेच पाणी शरीराला अपायकारक ठरून निरनिरळ्या रोगांसाठी कारणीभूत ठरू शकते. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसांत अनेकदा गढूळ पाणी पहावयास मिळते. त्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने आपण पीत असलेले पाणी हे शुद्ध, किटाणू विरहित असणे अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आपण फिल्टर्सचा वापर करीत असतो. पाणी शुद्ध करण्यासाठी तऱ्हे-तऱ्हेचे फिल्टर आजकाल बाजारामध्ये उपलब्ध आहेत. पण जर आपल्याकडे काही कारणाने फिल्टर उपलब्ध नसेल, तर त्याशिवायही पाणी कसे शुद्ध केले जाऊ शकते हे जाणून घेऊ या.

पाणी शुद्ध, किटाणूविरहित करण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे पाणी उकळून घेणे. पाण्याला एक उकळी आली की पाणी शुद्ध झाले अशी काहींची समजूत असते. ही समजूत चुकीची आहे. पाणी पूर्ण किटाणू रहित करण्यासाठी ते किमान पंधरा मिनिटे चांगले उकळून घेणे आवश्यक आहे. त्यानंतर हे पाणी गॅसवरून बाजूला काढून ठेवावे, आणि स्वछ झाकणीने झाकून ठेवावे, किंवा निवल्यावर स्वच्छ धुतलेल्या जगमध्ये किंवा बाटल्यांमध्ये भरून ठेवावे. कधी काही कारणाने फिल्टर उपलब्ध नसेल, तर पाणी उकळून घेणे, हा पाणी जंतूरहित करण्याचा सर्वात सोपा पर्याय आहे.

आजकाल बाजारामध्ये पाणी शुद्ध करणाऱ्या टॅबलेट्स उपलब्ध आहेत. ह्या टॅबलेट्स मुळे पाण्यातील किटाणू नष्ट होण्यास मदत होते. ह्या गोळ्यांचा वापर करणे अतिशय सोपे आहे. पाणी पिण्याअगोदर अर्धा तास ह्या गोळ्या पाण्यामध्ये मिसळाव्यात. त्यानंतर पाणी पिण्यास सुरक्षित असेल. ह्या गोळ्यांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम दिसून आले नसले, तरी गर्भवती महिलांनी ह्या गोळ्या मिसळून शुद्ध केलेले पाणी पिणे टाळावे. तसेच पाणी शुद्ध करण्याच्या हेतूने ह्या गोळ्या पाण्यामध्ये मिसळल्या असता पाण्याची चव तितकी चांगली लागत नाही, हे ही ध्यानात ठेवावे.

पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटीचा वापर आपल्याकडे फार पूर्वीपासून केला जात आहे. पिण्याचे पाणी साठविलेल्या भांड्यामध्ये थोडी तुरटी टाकून हे पाणी दोन तास झाकून ठेवावे. त्या दोन तासांच्या दरम्यान पाण्याचे भांडे वारंवार हलवू नये. दोन तासांच्या अवधीनंतर भांडयावरील झाकण उघडून पाहिले असता, पाण्यातील सर्व गाळ भांड्याच्या तळाशी जमा झालेला दिसेल. त्यानंतर वरवरचे पाणी काढून घेऊन तळातील पाणी टाकून द्यावे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment