डेटिंग साईट ने लावला मुंबईतील बँकरला 12 लाखांचा चुना


मोबाईल फोन वापरत असताना अनेकदा आपल्या फोन वर कुठली तरी जाहिरात दिसू लागते, किंवा अचानक कुठली तरी लिंक प्रकट होते. कधी ही जाहिरात अतिशय आकर्षक वाटल्याने, त्यामध्ये आणखी काय माहिती उपलब्ध आहे हे पाहण्याच्या उत्सुकतेपायी, आपण आपल्या मर्जीने, तर कधी घाईघाईत, चुकून आपण ह्या जाहिरातींवर ‘क्लिक’ करतो. पुष्कळदा अनेक व्यक्ती ह्या जाहिरातींना फशी पडतात, आणि त्यानंतर सर्वच मामला बिकट होऊन बसतो. असेच काहीसे मुंबईमध्ये राहणाऱ्या एका इसमाच्या बाबतीतही घडले. त्याने त्याच्या फोनवरील जाहिरातीवर क्लिक केले आणि ह्या जाहिरातीतील आमिषापायी त्याला तब्बल बारा लाख रुपये गमवावे लागले. विशेष गोष्ट अशी की ज्या इसमाला बारा लाख रुपयांना लुबाडले गेले आहे, तो स्वतः सुशिक्षित असून व्यवसायाने बँकर आहे.

घडले असे, की ह्या इसमाच्या फोनवर एका डेटिंग साईटची जाहिरात आली. त्यातील छायाचित्रात दर्शविलेल्या एका सुंदर तरुणीबरोबर ‘डेट’ वर जाण्याबद्दल ही जाहिरात होती. ह्या इसमाने ह्या जाहिरातीवर ‘क्लिक’ केले आणि जास्त विचार करण्याच्या भानगडीत न पडता, ‘डेट’ मिळविण्यासाठी जाहिरातीकरवी मागितली गेलेली सर्व व्यक्तिगत माहिती, सोबत असलेल्या फॉर्ममध्ये भरूनही टाकली. ही माहिती भरून फॉर्म ‘सबमिट’ केल्याच्या काही मिनिटांच्या अवधीतच ह्या इसमाला तान्या नामक मुलीचा फोनही आला. ह्या मुलीने त्या इसमाला, जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या तरुणीसोबत ‘डेट’ वर जाण्यासाठी ह्या इसमाची निवड केली गेल्याची ‘खुशखबर’ दिली. तसेच ‘डेट’ वर जाण्यापूर्वी काही पैसे जमा करण्याची आवश्यकता असून, हे पैसे ‘डेट’ पार पडल्यानंतर परत करण्यात येतील असे ही डेटिंग साईटच्या वतीने सांगण्यात आले.

‘डेट’ साठी पंचतारांकित हॉटेलमध्ये जायचे असल्याने त्यासाठी ३.४० लाख रुपये भरायचे असून, कोलकता येथील शुभेंदू मंडल नामक व्यक्तीच्या खात्यामध्ये हे पैसे जमा करण्यास सांगितले गेले. त्याप्रमाणे ह्या इसमाने हे पैसे जमा देखील केले. त्यानंतर ह्या इसमाला मिनी नामक मुलीचा फोन आला, आणि तिने ह्या इसमाला आणखी एका मुलीसोबतही ‘डेट’ वर जाण्याची ‘ऑफर’ देऊन, त्यासाठी आणखी १.२० लाख रुपये जमा करण्यास सांगितले. ह्या नंतर आलेल्या तिसऱ्या फोन कॉलच्या द्वारे, आणखी ५.२५ लाख रुपये भरण्यास सांगून ते पैसे भरल्यास, आता आणि ह्यापूर्वी भरलेले सर्व पैसे परत देण्याचे आश्वासन ह्या इसमाला देण्यात आले. ह्या इसमानेही ‘डेट’ वर जाण्याच्या उत्साहात, त्याला मागितलेले सर्व पैसे काहीही चौकशी न करता भरून टाकले.

ह्या सर्व प्रकाराला एक आठवडा उलटून गेला तरी आणखी पैशांची मागणी कायम असल्यामुळे आणि दरम्यानच्या काळामध्ये ‘डेट’बद्दल काहीच माहिती न मिळाल्याने अखेर ह्या इसमाला संशय आला. पैशांची मागणी करण्यासाठी जेव्हा डेटिंग साईटकडून फोन आला, तेव्हा ह्या इसमाने आपले सर्व पैसे परत हवे आहेत असे सांगून आपले अकाऊंट ‘डिलीट’ करायचे आहे असे सांगताच त्याला रुशी नामक मुलीचा फोन आला. ह्या मुलीने अकाऊंट डिलीट करायचा असल्यास आणखी दोन लाख रुपये भरायला लागतील असे सांगितले. हे मान्य करण्यास जेव्हा ह्या इसमाने नकार दिला तेव्हा डेटिंग साईटच्या वतीने त्याला धमक्या दिल्या जाऊ लागल्या. ह्या धमक्यांनी घाबरून जाऊन साईटच्या वतीने मागितले गेलेले दोन लाख रुपयेही ह्या इसमाने भरले. अश्याप्रकारे तब्बल बारा लाख पंचावन्न हजार रुपयांची रक्कम ह्या इसमाला भरावी लागली.
आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यामुळे ह्या इसमाने अखेर पोलिसांत तक्रार नोंदविली. प्रसार माध्यमांतील वृतांच्या अनुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेऊन तपासकार्य सुरु केल्याचे समजते.

Leave a Comment