ह्या गोष्टींवर ब्राझील देशामध्ये बंदी


ब्राझीलमध्ये गेले काही वर्षे सत्तेमध्ये सातत्याने परिवर्तन होत असताना, देशामध्ये कोणत्या गोष्टी करण्यासाठी परवानगी दिली जावी आणि कोणत्या गोष्टी करण्यासाठी परवानगी दिली जाऊ नये ह्या बद्दल नेहमीच दुमत राहिले आहे. ह्या देशामध्ये ज्या गोष्टी करण्यास बंदी आहे, त्यातील काही रास्त ही आहेत, पण काहींवरील बंदी मात्र बुचकळ्यात टाकणारी आहे. ह्या गोष्टी लक्षात घेता त्यावर बंदी असण्याचे कोणतेही कारण समोर येत नसल्याने बहुतेकांना आश्चर्य ही वाटून जाते.

१९४० सालापर्यंत रिओ दे जनेरो मध्ये फुटबॉल स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या महिला फुटबॉलपटूंच्या किमान दहा निरनिराळ्या टीम्स अस्तितवात होत्या. त्याकाळी महिलांमध्येही फुटबॉल हा खेळ अतिशय लोकप्रिय होता. तेव्हा तत्कालीन राष्ट्रपती गेतुलियो वार्गास ह्यांनी ब्राझिलियन संविधानाचे कलम ५४ लागू केले. ह्या कलमानुसार बायकांना कोणताही ‘पुरुषी’ खेळ खेळण्यास मनाई केली गेली. ह्या खेळांमुळे बायकांच्या प्रजननशक्ती वर विपरीत परिणाम होतात अशी त्याकाळची समजूत असल्याने महिलांना फुटबॉल खेळण्यास कायद्याने मनाई करण्यात आली. त्या काळी अस्तित्वात असलेल्या सर्व महिला संघांवर बंदी घालण्यात आली. हा कायदा १९७९ सालापर्यंत अस्तित्वात राहिला, त्यानंतर मात्र हा कायदा रद्द करण्यात आला.

‘सांबा’ हा नृत्यप्रकार हा आजच्या काळामध्ये ब्राझील देशाची खासियत असला, तरी विसाव्या शतकाच्या सुरुवातीला ह्या नृत्य प्रकाराकडे फारसे कौतुकाने पहिले जात नसे. किंबहुना, ह्या नृत्य प्रकारामुळे ब्राझील देशाची प्रतिमा मलीन होते आहे असे विचार त्याकाळी रूढ होते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला अॅफ्रीकन मुळाची जनता गुलामगिरीमध्ये जखडलेली होती. सांबा हा नृत्य प्रकार अॅफ्रिकन मूळाच्या लोकांकडून आला असल्याने, गुलामगिरी कायद्याने मना झाली असूनही, केवळ अॅफ्रीकन नृत्यप्रकार म्हणून सांबा नृत्यावर बंदी होती. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी जर कोणी सांबा करताना दिसले, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जात असे. १९१७ साली डोंगा नामक सांबा कलाकाराचे ‘पेलो टेलिफोन’ हे गीत प्रदर्शित झाल्यानंतर मात्र सांबा हा प्रकार लोकप्रिय झाला. आजच्या काळामध्ये सांबा हा ब्राझीलमधील अतिशय प्रसिद्ध आणि लोकप्रिय नृत्यप्रकार आहे.

ब्राझीलमध्ये सर्व बँकांमध्ये मोबाईल फोन वापरण्यास बंदी आहे. ज्या व्यक्ती ह्या नियमाचे पालन करीत नाहीत, त्यांना त्यासाठी दंड भरावा लागतो. तसेच साओ पाउलो शहरामध्ये रस्त्यांवर जाहिरातींची होर्डींग्ज लावण्यास मनाई आहे. गाडी चालविताना चालकाचे चित्त, ह्या मोठमोठ्या होर्डींग्जमुळे विचलित होऊ नये हा त्यामागील हेतू आहे. मात्र ही बंदी केवळ शहराच्या अंतर्गत भागामध्ये लागू असून, शहराच्या हद्दीच्या बाहेर होर्डींग्ज लावण्यास बंदी नाही. ब्राझीलमध्ये आजच्या काळामध्ये महिलांच्या अंगावर सर्रास दृष्टीस पडणाऱ्या ‘बिकिनी’ वर देखील एके काळी बंदी असे. बिकिनी हे परिधान अतिशय असभ्य असल्याचे तत्कालीन राष्टपती जेनियो क्वाड्रोस ह्यांचे मत होते. मात्र सत्ता बदलल्यानंतर राष्टपतीही बदलले आणि त्याचबरोबर हा नियमही बदलला.

ब्राझील देशातील बहुतेक राज्यांमध्ये हेल्मेट, किंवा चेहरा झाकेल असे कोणतेही परिधान घालण्यास मनाई आहे. लूट, दरोडे असे प्रकार घडलेच तर गुन्हेगारांचे चेहेरे सेक्युरिटी कॅमेरामध्ये त्वरित दिसावेत ह्या हेतुने ही बंदी घालण्यात आली आहे. तसेच कसिनो आणि जुगार खेळण्यावरही बंदी आहे. ह्या ठिकाणी किती ‘कॅश फ्लो’ आहे, म्हणजेच पैशांची आवक किती होते आहे, ह्यावर सरकारला नजर ठेवणे शक्य नसल्याने मुळातच जुगार खेळण्यावर बंदी घालण्यात आली. १९४६ साली ह्या कायद्यामध्ये परिवर्तन करण्यात आले. आता प्रत्यक्षात जुगार खेळण्यावर कायद्याने बंदी असली, तरी ऑनलाईन बेटिंगवर किंवा जुगार खेळण्यावर कायद्याने बंदी नाही.

Leave a Comment