रिझर्व्ह बँकेने व्याजदरात केली पाव टक्क्यांची वाढ


मुंबई – भारतीय रिझर्व्ह बँकेने अखेर तब्बल साडे चार वर्षांनी व्याजदरांमध्ये वाढ केली आहे. आरबीआय ज्या दराने बँकांना वित्तपुरवठा करते रेपो रेट आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने पाव टक्क्यांनी वाढवून ६.२५ टक्के केला आहे.

ज्या दराने बँका आपल्याकडे असलेला अतिरिक्त निधी रिझर्व्ह बँकेकडे जमा करतात त्यावर (म्हणजे रिव्हर्स रेपो) त्यांना ६ टक्के व्याज मिळेल. दोन सदस्यांनी एप्रिल महिन्यामध्येच पाव टक्के दरवाढीची शिफारस केली होती. सर्वच्या सर्व सदस्यांनी आजच्या बैठकीमध्ये दरवाढीच्या प्रस्तावाला समर्थन दिले व ही वाढ एकमताने करण्यात आली आहे.

भविष्यातील सर्व कर्जांचे दर या दरवाढीमुळे वाढू शकतात. परिणामी गृहकर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्जे यांचे दर वाढण्याची शक्यता आहे. साधारणपणे रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये वाढ केली की बँका हा वाढीव बोजा ग्राहकांकडे सरकवतात. असा अनुभव आहे की सगळ्यात मोठी सरकारी बँक प्रथम व्याजदरात वाढ करते मग मागोमाग सगळ्या बँकांचे कर्जही महागते.

Leave a Comment