एथर एनर्जीने भारतात लॉन्च केली सगळ्यात महागडी स्कूटर


मुंबई : दुचाकी बनवणारी कंपनी एथर एनर्जीने नुकत्याच दोन नवीन स्कूटर भारतीय बाजारात उतरवल्या आहेत. या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटर असून भारतातील या स्कूटर सगळ्यात महागड्या आहेत. एथर ४५० आणि एथर ३४० या दोन स्कूटर लॉन्च कंपनीने केल्या. एथर ४५० ची किंमत १,२४,७५० रुपये आणि एथर ३४०ची किंमत १,०९,७५० रुपये आहे. शहरी भागात चालवण्यासाठी कंपनीने एथर ४५० बनवली आहे. ही स्कूटर ८० किमी प्रती तासाच्या वेगाने चालते. तसेच ४० किमीचा वेग ३.९ सेकंदात पकडते, असा कंपनीने दावा केला आहे.

ही स्कूटर सध्या बंगळुरूमध्ये प्री-ऑर्डरवर मिळत असून स्कूटरच्या किंमतीमध्ये २२ हजार रुपयांची सबसिडी, जीएसटी, रोड टॅक्स, स्मार्ट कार्ड फी, रजिस्ट्रेशन फी आणि इन्श्यूरन्सचा समावेश आहे. ४ वर्षांपूर्वी ही स्कूटर आयआयटी मद्रासमध्ये बनवायला सुरुवात झाली होती.

ही स्कूटर सध्या बंगळुरूमध्येच मिळत असली तरी पुढच्या टप्प्यामध्ये पुणे आणि चेन्नईमध्येही या स्कूटरची विक्री होईल. ही स्कूटर एकदा चार्ज केल्यावर ६० किमीपर्यंत चालू शकते. स्कूटर ८० टक्के चार्ज होण्यासाठी एक तासाचा वेळ लागतो. खड्डे असलेल्या रस्त्यावर ही स्कूटर चालवण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा कंपनीने केला आहे. दोन्ही स्कूटरला फ्रंट आणि रियरमध्ये सीबीएस सिस्टिमसोबत डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत.

Leave a Comment