या सात राज्यांना त्यांची नावे कशी मिळाली?


भारतामध्ये असलेल्या ह्या सात राज्यांना त्यांची नावे कशी मिळाली हा इतिहास मोठा रोचक आहे. ह्या नावांच्या मागचा इतिहास लोकांच्या फारसा परिचयाचा नाही. पण ह्या राज्यांना त्यांची नावे देण्यामागे काही कारणे खचितच होती. त्याचबद्दल माहिती, ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

अरुणाचल प्रदेश हे पूर्वेकडील राज्य. निसर्गाचा वरदहस्त, सुंदर पर्वतराजी, आणि त्यांची मनोरम दृश्ये लाभलेले हे राज्य. सूर्याचा उदय होताना त्याच्या किरणांच्या सोनेरी प्रकाशामध्ये न्हाऊन निघणारी पर्वतराजी येथे पाहावयास मिळत असल्याने ह्या राज्याचे नाव अरुणाचल पडले. ‘बिहार’ हे नाव मूळ ‘विहार’ ह्या अर्थी वापरले गेले आहे. एके काळी ह्या प्रदेशमध्ये बौद्ध धर्माच्या अनुयायांची संख्या जास्त असून, बुद्ध गया आजही बौद्ध धर्मस्थानांपैकी प्रमुख स्थान आहे. बौद्ध भिक्षूंच्या निवासस्थानाला ‘विहार’ म्हटले गेले आहे. ह्या प्रांतामध्ये बौद्ध धर्माचे अनुयायी येऊन राहत असत, म्हणून ह्या प्रांताला ‘विहार’ हे नाव देण्यात आले. कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन त्याचे ‘बिहार’ झाले.

आसाम प्रांतावर एके काळी ‘अहोम’ राजवंशाची सत्ता होती. आसाम हे नाव ‘अहोम’ वंशाच्या लोकांवरून पडले असण्याची शक्यता आहे. तर काहींच्या मते येथे कुठे डोंगर तर कुठे सपाट भूभाग असे एकसमान नसणारे भूभाग आहेत, त्यामुळे ह्या प्रांताचे नाव ‘असम’ पडले. ‘असम’ हा मूळचा संस्कृत शब्द आहे. त्याचप्रमाणे कर्नाटक राज्याला त्याचे नाव कसे मिळाले असावे, ह्याबद्दलही अनेक आख्यायिका आहेत. कन्नड भाषेतील दोन शब्द ‘करू’ आणि ‘नाडू’ ह्या दोन शब्दांची संधी करून हे नाव बनले असल्याचे काहींचे म्हणणे आहे. ‘करू’ म्हणजे उंच आणि ‘नाडू’ म्हणजे भूभाग. म्हणजेच अनेक उंच भूभाग असलेला हा प्रांत कर्नाटक ह्या नावाने ओळखला गेला असे म्हणतात.

केरळ राज्याला त्याचे नाव कसे पडले ह्याबद्दलची प्रसिद्ध आख्यायिका अशी, की भगवान परशुरामांनी ही भूमी समुद्रातून उत्पन्न केली, आणि त्याला ‘चेर्नालम’ असे नाव दिले. ह्या नावाचा अर्थ ‘अधिक झालेली’ किंवा वाढविलेली (भूमी) असा सांगितला गेला. कालांतराने ह्या नावाचा अपभ्रंश होत चेर्नालमचे केरला किंवा केरळ हे नाव अस्तित्वात आले. छत्तीसगड ह्या राज्याच्या नावाचा अर्थ अगदी सरळ, सोपा आहे. नावाप्रमाणेच छत्तीस गड किंवा किल्ले असलेले हे राज्य आहे. ह्या राज्यातील समस्त किल्ल्यांच्या सन्मानार्थ ह्या राज्याला छत्तीसगड हे नाव देण्यात आले आहे. तर ‘मणिपूर’ ला अतिशय संपन्न असलेला, बहुमूल्य रत्नांचा प्रांत म्हटले गेले आहे.