गंगेचा हा घाट पापमुक्तीबरोबर देतो पत्नीमुक्ती


वाराणसी किंवा काशी म्हणजे देशातले पवित्र तीर्थस्थान. येथील गंगेत एक डुबकी मारली कि साऱ्या पापांचा नाश होतो अशी श्रद्धा. यामुळे देशभरातून लाखोनी भाविक येथे गंगास्नानाला येतात. वाराणसीत गंगेवर ८४ घाट बांधले गेले असून त्या प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट आहे. या प्रत्येक घाटामागे काही कथा आहेत. त्यातील कुवाई किंवा नारद घाट याची कथा मात्र वेगळीच असून याला पत्नीमुक्ती घाट असेही म्हटले जाते.

असे म्हणतात कि या घाटावर पतीपत्नीने एकत्र गंगेत डुबकी मारली तर पाप धुतले जाते कि नाही सांगता येणार नाही मात्र पतीपत्नी मध्ये मतभेद सुरु होतात. कुरबुरी सुरु होतात आणि काही वेळा त्या इतक्या वाढतात कि त्याचे पर्यवसान काडीमोड घेण्यात होते. यामुळे या घाटाला स्थानिक लोक पत्नी मुक्ती घाट असे म्हणतात. बायकोच्या त्रासाला वैतागलेले नवरे येथे गर्दी करतात असेही म्हटले जाते.

या घाटावर नारदेश्वर हे शंकराचे मंदिर असून ते नारद मुनींनी बांधले असे म्हटले जाते. त्यामुळे कुवाई घाटाला नारद घाट असे नाव पडले आहे. नारद ब्रह्मचारी होते त्यामुळे या घाटावर जोडप्याने स्नान केले तर विवाह मोडण्याची शक्यता असते. या घाटावर जोडपी स्नानासाठी आली तर पुजारी त्यांना सावध करतात आणि जोडीने स्नान न करण्याचा सल्ला देतात असेही समजते.

Leave a Comment