मुंबई पालिका आयुक्तांनी रद्द केली अधिकाऱ्यांची रविवारची सुटी


मुंबई – पावसाळ्यात मुंबापुरीची तुंबापुरी होऊ नये यासाठी सध्या मोठय़ा प्रमाणावर कामे हाती घेण्यात आली असून पालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांना त्याचबरोबर मोठय़ा संख्येने रस्त्यांची आणि चर खोदणे व भरण्याची कामे सुरू असून कामे पूर्ण झाल्यानंतर तेथे बांधकामविषयक साहित्य पडून राहणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना दिले आहेत. कोणत्याही प्रकारचा कचरा रस्त्यावर साचून राहू नये यासाठी आज पालिका उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांनी जातीने पाहणी करावी, असे आदेश देत या अधिकाऱ्यांची रविवारची रजा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी रद्द केली. रविवारी अधिकाऱ्यांनी रस्त्यांची पाहणी केल्याचा पुरावा म्हणून आपली छायाचित्रे अतिरिक्त आयुक्तांना पाठविण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मुंबईकरांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये याची काळजी घेण्याचे निर्देश अजोय मेहता यांनी पालिका उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांना पालिका मुख्यालयात आयोजित आढावा बैठकीत दिले. मुंबईमध्ये अनेक ठिकाणी रस्ते, पदपथांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तसेच काही ठिकाणी चर खोदण्याची वा ते भरण्याची कामे सुरू आहेत. ज्या ठिकाणी कामे झाली आहेत अशा ठिकाणी खडी, डांबर, बॅरिकेड्स पडून राहतात आणि त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे कामे पूर्ण झाल्यानंतर कार्यस्थळावरून बांधकामविषयक साहित्य तात्काळ हटविण्याचे आदेश यापूर्वीच अजोय मेहता यांनी दिले होते. पण बांधकामविषयक साहित्य टाकून कंत्राटदार पळ काढत असल्याचे आयुक्तांच्याच निदर्शनास आल्यामुळे मासिक आढावा बैठकीमध्ये अजोय मेहता यांनी या प्रकारांची गंभीर दखल घेतली. परिमंडळीय उपायुक्त आणि साहाय्यक आयुक्तांनी ३ जून रोजी रविवारची सुट्टी न घेता आपल्या विभाग कार्यालयाच्या हद्दीतील रस्ते, पदपथ आणि चर यांची कामे पूर्ण झालेल्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी. तेथे बांधकामविषयक साहित्य पडलेले निदर्शनास आल्यास ते तात्काळ योग्य ठिकाणी हलवावे. ही कामे येत्या सोमवापर्यंत पूर्ण करावी, असे आदेश अजोय मेहता यांनी दिले.