आता घरच्या घरी तयार करा निरनिराळे क्लीनर्स


घरामध्ये साफ सफाई ठेवण्यासाठी आपण निरनिरळ्या क्लीनर्सचा वापर करीत असतो. घर आणि घरातील वस्तू, निर्जंतुक व्हाव्यात ह्या करिता मुख्यत्वे ह्या क्लीनर्सचा वापर केला जात असतो. पण साफसफाई करण्याकरिता केवळ एकच क्लीनर असून काम भागत नाही. काचेच्या वस्तू पुसण्यासाठी एक क्लीनर, लाकडी सामानासाठी दुसरा, तर बाथरूम्स, घरातील फरशी ह्यांच्याकरीता देखील वेगवेगळ्या क्लीनर्सचा वापर आपण करीत असतो. ह्यासाठी आपले पुष्कळसे पैसेही खर्च होत असतात. त्यामुळे पैशांची बचत करून, तितकीच उत्तम सफाई देणारे काही क्लीनर्स आपण घरच्याघरी देखील तयार करू शकतो.

एका स्प्रे बॉटल मध्ये व्हिनेगर आणि पाणी समप्रमाणात मिसळून हे मिश्रण स्टेनलेस स्टीलच्या वस्तू साफ करण्यासाठी वापरता येते. आजकाल फ्रीज, ओव्हन, टोस्टर, इत्यादी वस्तू स्टेनलेस स्टील फिनिश मध्ये जास्त पसंत केल्या जात आहेत. ह्या वस्तू हाताळताना ह्यांवर हातांचे ठसे उमटत असतात, किंवा इतरही डाग पडत असतात. हे सर्व डाग घालवून स्टेनलेस स्टील चमकविण्याच्या कामी पाणी आणि व्हिनेगरचे मिश्रण सहायक आहे. बाथरूम, किचन मधील नळ, किचनमधील सिंक चमकविण्यासही हे मिश्रण सहायक आहे. मात्र व्हिनेगर अॅसिडिक असल्यामुळे ग्रेनाईट किंवा संगमरवरी ओट्यावर वापरू नये.

अनेकदा स्वयंपाकघरातील सिंक ( बेसिन ) अन्न पदार्थांचे कण अडकल्यामुळे तुंबते, व त्यातून पाणी वाहून जात नाही. ‘ड्रेनेक्स’ सारखी पावडर वापरून ही समस्या सोडविता येऊ शकते. पण जर ही पावडर आपल्याकडे उपलब्ध नसेल, तर घरी नेहमी असणारे पदार्थ वापरूनही ही समस्या आपण सोडवू शकतो. ह्यासाठी समप्रमाणात मीठ आणि बेकिंग सोडा एकत्र करून बेसिनच्या ड्रेनमध्ये घालावे. त्यावर गरम केलेले व्हिनेगर ओतावे. त्यानंतर एखाद्या मिनिटाने उकळते पाणी ड्रेनमध्ये ओतावे. ह्यामुळे ड्रेन खुलेल आणि पाण्याचा निचरा पूर्वीप्रमाणे होऊ लागेल. तसेच टॉयलेट निर्जंतुक करण्यासाठी एक कप बेकिंग सोडा, पाव कप सायट्रिक अॅसिड आणि एक टेबलस्पून भांडी धुण्याचा लिक्विड सोप असे एकत्र करावे. हे मिश्रण थोडे चिकट होईल. त्याचे लहान लहान गोळे करावेत, किंवा एखाद्या आईस ट्रे मध्ये हे मिश्रण घालावे. त्यानंतर चार तास हे मिश्रण वाळू देऊन त्यानंतर त्याचे गोळे किंवा क्युब्स काढून एका बरणीत भरून ठेवावे. ह्यांचा वापर करण्यासाठी एक गोळा किंवा क्यूब टॉयलेट मध्ये टाकून ती फेसाळल्यावर टॉयलेट फ्लश करावे.

बाथरूममधील, किंवा किचनमधील टाईल्स साफ करण्यासाठी एका स्प्रे बॉटल मध्ये अर्धा कप भांडी धुण्याचा लिक्विड सोप आणि एक कप व्हिनेगर एकत्र करावे आणि टाईल्सवर स्प्रे करावे आणि अर्ध्या तासाने ओलसर कपड्याने टाईल्स स्वछ पुसून काढाव्यात. ह्याने टाईल्सवरील चिकटपणा नाहीसा होऊन टाईल्स चमकदार होतात. आजकाल अनेक घरांमध्ये भांडी धुण्यासाठी डिशवॉशरचा उपयोग होऊ लागला आहे. ह्या डिशवॉशर मध्ये भांडी धुण्यासाठी सामान्य साबण न वापरता, त्यासाठी खास बनविले जाणारे डिशवॉशर डीटर्जंट पॉड्स वापरण्याची आवश्यकता असते. हे पॉड्स घरच्या घरी तयार करण्यासाठी मीठ, बेकिंग सोडा, आणि वॉशिंग सोडा समप्रमाणात एकत्र करून त्यामध्ये पाव भाग सायट्रिक अॅसिड मिसळावे. ह्यामध्ये अर्धा कप पाणी मिसळून त्याचे घट्टसर मिश्रण बनवून घ्यावे. त्यानंतर आईस ट्रे मध्ये हे मिश्रण भरून रात्रभर वाळू द्यावे. दुसऱ्या दिवशी ह्या क्युब्स काढून घेऊन बरणीमध्ये भरून ठेवाव्यात. ह्या क्युब्सचा वापर डिशवॉशर मध्ये करावा.

Leave a Comment