व्यायाम म्हणून पळणे सुरु करणार असल्यास अवलंबा ह्या टिप्स


आजकाल लोक आपल्या आरोग्याच्या प्रति जास्त सजग राहू लागल्याचे दिसून येत आहे. शरीर निरोगी राहावे, सुदृढ राहावे ह्यासाठी संतुलित आहाराबरोबरच व्यायामाचे महत्वही लोकांना पटू लागले आहे. त्यामुळे आपापल्या आवडी प्रमाणे, आणि सवड मिळेल त्याप्रमाणे लोक व्यायाम करताना दिसतात. कोणी सायकलिंग करते, कोणी योगासने, तर कोणी पोहायला जाते. ह्या निरनिरळ्या व्यायाम प्रकारांसोबतच आजकाल रनिंग, किंवा धावणे हा व्यायामप्रकार झपाट्याने लोकप्रिय होऊ लागला आहे. त्यासाठी अनेक शहरांमध्ये आजकाल रनिंग ग्रुप्सही कार्यरत आहेत. निरनिराळ्या ठिकाणी आयोजित होत असणाऱ्या मॅरॅथॉन्समध्ये सर्व वयोगटांतील लोक उत्साहाने सहभागी होत असताना पाहायला मिळत आहेत. हे पाहून अनेकांना रनिंग सुरु करण्याची प्रेरणा मिळत आहे. त्यामुळे रनिंग सुरु करताना काही टिप्सचा नक्की उपयोग होऊ शकतो.

रनिंग सुरु करण्यासाठी सर्वप्रथम उत्तम प्रतीच्या रनिंग शूजची आवश्यकता असते. पळताना पायाच्या तळव्यांना योग्य आधाराची गरज असते. शूजची निवड करताना शूजमध्ये पाऊल घातल्यानंतर पायांची बोटे व्यवस्थित हलविता यायला हवीत. जर पायाची बोटे हलविण्यासाठी जराही जागा शूजमध्ये नसेल तर ते शूज घेऊ नयेत. शूज पावलांवर व्यवस्थित फिट व्हावेत, पण घट्ट असू नयेत. पळायला जाताना रनिंग बेल्ट बरोबर असावा. ह्यामध्ये तुम्ही तुमचा फोन, घराच्या किंवा गाडीच्या किल्ल्या, तुमचे ओळखपत्र इत्यादी वस्तू सुरक्षितपणे नेऊ शकता.

पळायला जाण्याच्या किमान अर्धा तास आधी हलका आहार घेणे आवश्यक आहे. ह्यासाठी कॉम्प्लेक्स कर्बोदके असणारा आहार उत्तम. एखादे केळे खाणे हा आदर्श पर्याय आहे. पळायला जाण्यापूर्वी पोटभर नाश्ता करू नये. तसेच बर्गर इत्यादी पदार्थ आवर्जून टाळावेत. पळायला सुरुवात करताना सुरुवातीलाच वेगात धावू नये. जर तुम्ही पहिल्यांदाच पळत असाल, तर एक मिनिट धावणे ( हलके जॉगिंग), आणि पाच मिनिटे चालणे असे शेड्युल ठेवावे. जसजसा सराव वाढेल, तसतसा चालण्याचा वेळ कमी करून पळण्याचा वेळ आणि वेग वाढवावा. सुरुवातीला आठवड्यातील सर्व दिवस पळू नये. एक दिवस रनिंग आणि एक दिवस विश्रांती असे शेड्युल ठेवावे. विश्रांतीच्या दिवशी पोहोणे, योगासने, वेट ट्रेनींग हे व्यायाम करावेत. हे सर्व व्यायाम पळण्यासाठी पूरक आहेत. ह्यांच्यामुळे शरीरातील स्नायूंना आवश्यक ते स्ट्रेचेस मिळत असतात, पळण्यामुळे स्नायूंवर किंवा सांध्यांवर आलेला ताण कमी होतो, आणि हृदयाचे आरोग्य देखील चांगले राहते.

धावण्यासाठी कच्चा रस्ता किंवा गवत असलेल्या ठिकाणचा उपयोग करावा. कच्चा रस्ता हा डांबरी रस्त्याच्या मानाने, पावलांना अधिक ‘कुशनिंग’ पुरविणारा आहे. धावताना रस्त्यातील खड्डे, झाडांची जमिनीवर पसरलेली मुळे पायांत येणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी. धावताना पोटाच्या कडेला दुखू नये, किंवा पोटात क्रँप्स येऊ नयेत ह्यासाठी पळण्याआधी किमान तासभर आधी काही भरपेट खाऊ नये.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment