बेनामी संपत्तीची माहिती द्या आणि करोडपती व्हा


नवी दिल्ली – केंद्र सरकारने बेनामी संपत्तीला आळा घालण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून बेनामी संपत्तीबाबत जर कोणीही माहिती दिली तर त्या व्यक्तीला आयकर विभागाकडून १ कोटीचे बक्षीस मिळणार असल्याची घोषणा अर्थ मंत्रालयाने केली आहे.

अर्थ मंत्रालयाच्या घोषणेनुसार आयकर अधिकारी अथवा अतिरिक्त आयुक्त यांच्याकडे कोणत्याही व्यक्तीने एखाद्या व्यक्तीच्या बेहिशोबी संपत्तीची पुराव्यानिशी माहिती दिल्यास त्याला बक्षीस दिले जाणार आहे. केंद्र सरकारने बेनामी संपत्ती हस्तांतरण रोखण्यासाठी चालविलेल्या ‘बेनामी व्यवहार माहिती बक्षीस योजना २०१८’ योजनेतून या बक्षीसाची रक्कम दिली जाणार आहे.

बेनामी संपत्ती आयकर विभागाच्या टप्प्यात येण्यासाठी केंद्र सरकारने ही योजना काढली आहे. बेनामी संपत्तीची अनेकजणांना माहिती आहे, पण ते त्याबाबतची माहिती सरकारला कळवित नाहीत, असे अर्थ मंत्रालयाचे म्हणणे आहे. माहिती कळवून आपला काय फायदा असे त्यांना वाटत असल्याने थेट त्यांना बक्षीस देण्याची शक्कल सरकारने लढविली आहे. बेनामी संपत्तीला आळा घालण्यासाठी बेनामी संपत्ती हस्तांतरण १९८८ कायद्याला कर २०१६ असे कायद्याचे नवे स्वरुप देण्यात आले आहे.

या कायद्यानुसार बेनामी संपत्तीची माहिती कळवून विदेशी नागरिकही बक्षीस मिळवू शकतो. याबाबतची संपूर्ण माहिती आयकर विभागाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बेनामी संपत्तीशिवाय करचोरीची माहिती देणाऱ्यास ५० लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. ही योजना १९६१ आयकर कायद्यानुसार राबविण्यात येत आहे.

Leave a Comment