लक्झरी गाडीच्या किंमतीत दोन खरबुजे !


बाजारामध्ये खरेदी करण्यासाठी गेले, की महागाईच्या चढत्या कमानीचा नव्याने साक्षात्कार आपल्यापैकी सर्वानांच होत असतो. मग अगदी भाज्या फळे, यांसारख्या वस्तू जरी असल्या, तरी त्यांचे वाढत जाणारे दाम ऐकून नव्याने धक्के बसत असतात, आणि फळे घ्यावीत किंवा घेऊ नयेत हा विचारही मनामध्ये हमखास डोकावतो. पण ह्या जगामध्ये काही फळे अशीही आहेत, ज्यांच्या किंमती शंभराच्या, हजारांच्या घरांतच नाहीत, तर लाखोंच्या घरामध्ये आहेत. वाचून धक्का बसला ना? पण ही वस्तुस्थिती आहे. जपान देशातील ह्या ‘युबरी’ फळांच्या किंमती लाखो रुपयांच्या घरात आहेत.

आजकाल जपान देशामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणाऱ्या ‘युबरी’ खरबूजांच्या चर्चेने धमाल उडवून दिली आहे. ही दोन खरबुजांची जोडी तब्बल २९,३०० अमेरिकन डॉलर्स ला विकली गेली आहे, भारतीय चलनामध्ये ही किंमत सुमारे वीस लाख इतकी आहे. जपान मध्ये ह्या विशिष्ट ‘युबरी’ जातीच्या खरबुजांना प्रतिष्ठेचे, मानाचे प्रतीक समजले जाते. ज्याप्रमाणे उत्तम प्रकारचे मद्य किंवा वाईन ठेवणे स्टेट्स सिम्बॉल समजले जाते, तसेच काहीसे ह्या खरबुजांच्या बाबतीतही आहे. त्यामुळे हे हंगामी फळ खरेदी करण्यामध्ये श्रीमंत, उच्चभ्रू लोकांची जास्त रुची असते.

अनेक लोक ही खरबुजे आपल्या परिवारजनांना किंवा मित्रमंडळींना भेट म्हणूनही देतात. उत्तरी होकाईडोमधील सापोरो सेन्ट्रल मार्केटमध्ये ही खरबुजे निलामीमार्फत विक्री करीता उपलब्ध असता, फळांचे पॅकेजिंग करणाऱ्या एका स्थानीय कंपनीने सर्वात जास्त बोली लाऊन ह्या ‘युबरी’ खरबुजांची खरेदी केली. यंदाच्या वर्षी युबरी जातीच्या खरबुजांचे जपान मध्ये चांगले पीक आले आहे. मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच इथे चांगले ऊन पडत असून, त्याचा फायदा ह्या खरबुजांच्या पैदाशीला झाला आहे.

युबरी खरबुजे जगातील सर्वात महाग फळांपैकी एक समजली जातात. हे खरबूज केवळ जपान देशातच होते. ह्या फळाचा स्वाद ह्याची खासियत असून, अशी चव जगातील अन्य कोणत्याच खरबूजाची नसल्याचा दावा केला जातो. म्हणूनच अगदी लाखो रुपये खर्च करूनही लोक ही खरबुजे विकत घेताना दिसतात.

Leave a Comment