लिफ्टमध्ये आरसा कशासाठी असतो?


तळमजल्यावरून सर्वात वरच्या मजल्यापर्यंत काही मिनिटांच्या अवधीत पोहोचविणाऱ्या लिफ्टमध्ये आरसा का असावा, हा विचार आपण कधी केला आहे का? ह्यामागे खरे तर एक महत्वाचे कारण आहे. इंजिनियर्स आणि लिफ्ट्स तयार करणाऱ्या कंपन्यांनी अतिशय विचारपूर्वक घेतलेला हा निर्णय आहे. जेव्हा औद्योगीकरणाला सुरुवात होऊन शहरे झपाट्याने वाढू लागली, तेव्हा अधिक जागेची आवश्यकता पुरी करण्यासाठी इमारतींचा आडवा विस्तार जमिनीवरून उठून आकाशाच्या दिशेने झेपावला, आणि गगनचुंबी इमारतींचे निर्माण सुरु झाले. जसजसे मजल्यांवर मजले चढू लागले, तसतशी एलिव्हेटर, म्हणजेच लिफ्टची गरज भासू लागली.

सुरुवातीला जेव्हा एलिव्हेटरची संकल्पना प्रत्यक्षात उतरली, तेव्हा त्या काळाच्या लिफ्ट अतिशय धीम्या गतीने चालत असत. त्यामुळे लोकांना तळमजल्यावरून वरच्या मजल्यांपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त वेळ लागत असे. तसेच ही कल्पना नवी असल्याने अनेकांना लिफ्टविषयी मनामध्ये शंका असत. लिफ्ट तुटणार तर नाही, किंवा आपण ह्यामध्ये अडकणार तर नाही, ह्यामुळे कोणता अपघात तर होणार नाही अश्या अनेक तऱ्हेच्या शंका लोकांच्या मनामध्ये असत. त्यामुळे एलिव्हेटर्स बनविणाऱ्या कंपन्यांना, लोकांच्या मनामध्ये असलेल्या लिफ्ट विषयीच्या भीतीवर काही तरी उपाय शोधून काढण्याची गरज प्रकर्षाने भासू लागली.

मनामध्ये भीती असल्याने लिफ्ट वरपर्यंत पोहोचण्यासाठी जास्त अवधी घेते आहे अशी लोकांची केवळ समजूत असल्याचे एका शास्त्रज्ञाचे मत पडले. ज्याप्रमाणे आपल्याला आवडत नसलेले लेक्चर लांबच लांब, रटाळ वाटू लागते, तेच मानसशास्त्र येथेही आहे. लोकांच्या मनातील ही भीती काढून टाकण्याकरिता ह्या वैज्ञानिकाने एक युक्ती योजिली. त्याच्या मते, लिफ्ट मध्ये जर आरसे लावले गेले, तर लिफ्ट मधील लोक स्वतःला त्यामध्ये न्याहाळण्यात मश्गुल होतील, आणि त्यांना लिफ्टबद्दल वाटत असणाऱ्या भीतीचा विसर पडेल. लिफ्ट बनविणाऱ्या कंपन्यांनी ह्या युक्तीचा अवलंब केला, आणि ही युक्ती सफलही झाली. म्हणूनच लिफ्टमध्ये आरसा लावण्याची पद्धत अस्तित्वात आली.