बर्माचे अखेरचे राजे किंग थिबॉ यांचे रत्नागिरीमध्ये अखेरचे दिवस


१८५७ सालच्या उठावानंतर मुघल साम्राज्याचे अखेरचे राजे बहादूर शाह जाफर ह्यांना ब्रिटीश सरकारने बर्मा येथील रंगून ह्या ठिकाणी कैदेत ठेवले होते, हे तथ्य इतिहासामध्ये नमूद आहे. बहादूर शाह ह्यांचा अंत देखील रंगून येथेच झाला. पण बरोबर ह्याच्या उलट बर्माचे अखेरचे राजे किंग थिबॉ ह्यांच्याबाबतीत घडले, हे तथ्य फारसे ऐकिवात नाही. जसे बहादूर शाह जफर ह्यांनी त्यांचे अखेरचे दिवस बर्मामध्ये कैदेत घालविले, तसेच बर्माचे राजे किंग थिबॉ ह्यांचे अखेरचे दिवसही कैदेतच, पण महाराष्ट्रातील रत्नागिरी या ठिकाणी गेले.

मुंबईपासून सुमारे ३५० किलोमीटर अंतरावर असलेले रत्नागिरी, तेथे होणाऱ्या हापूस आंब्यांमुळे जगप्रसिद्ध आहे. पण त्याशिवायही रत्नागिरीचा उल्लेख इतिहासामध्ये आहे, तो आणखी एका कारणासाठी. १९१६ सालापर्यंत बर्माचे अखेरचे राजे किंग थिबॉ हे ह्यांचे रत्नागिरीत वास्तव्य होते. येथे किंग थिबॉ ह्यांनी आपले अखेरचे दिवस, राजकीय कैदी म्हणून व्यतीत केले. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक युरोपियन सत्ता बलशाली होत होत्या. एका मागून एक आशियायी राज्ये त्यांच्या ताब्यात जात होती. श्रीलंकेतील राज्ये, कॅम्बोडिया, लाओस, मलेशियन आणि इंडोनेशियन सल्तनतींवर ब्रिटीश, फ्रेंच, डच सत्तांचे साम्राज्य प्रस्थापित होत होते.

बर्माचे तटीय क्षेत्र ब्रिटीश अधिपत्याखाली असले, तरी ‘किंग्डम ऑफ अवा’ हा बर्माचा भाग तेव्हाही स्वतंत्र होता. ह्या भागावर राजे थिबॉ मीन ह्यांचे अधिपत्य होते. किंग थिबॉ ह्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ह्या राज्यकर्त्याने १८७८ साली राज्यकारभाराची जबाबदारी पेलली. सुधा शाह ह्यांनी लिहिलेल्या ‘ द किंग इन एक्झाइल’ ह्या पुस्तकामध्ये किंग थिबॉ ह्यांचा आयुष्यपट विस्तारपूर्वक मांडलेला आहे. किंग थिबॉ ह्यांची पत्नी राणी सुपायलात हिच्या हट्टी स्वभावापायी आणि अति महत्वाकांक्षी स्वभावापायी राज्याचा विनाश कसा झाला ही कथा देखील ह्या कादंबरीमध्ये विस्तारपूर्वक मांडलेली आहे.

राणी सुपायलात ही अतिशय क्रूर, कारस्थानी आणि महत्वाकांक्षी स्त्री होती. राज्याची सत्ता आपल्याच हातामध्ये ठेवण्याकरिता राणी सुपायलातने राज्याच्या इतर वारसदारांच्या हत्या करविल्या. त्या काळी बर्मातील इतर प्रांतांवर सत्ता असणाऱ्या ब्रिटीशांच्या विरुद्ध देखील राणी सुपायलात हिने फ्रेंच सत्तेशी संगनमत करण्यास सुरुवात केली. ह्या गोष्टीची खबर मिळताच ब्रिटीश सावध झाले. टीक जातीचे लाकूड, रबर आणि बर्मीझ माणिके ह्यांनी संपन्न असलेला हा प्रांत कुठल्याही परिस्थितीत ब्रिटीश सोडणार नव्हतेच. त्यामुळे त्यांना बर्माच्या इतर प्रांतांवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी केवळ निमित्तमात्र हवे होते. हे निमित्त त्यांना मिळालेही, जेव्हा अवा संस्थानाने १८८५ साली ब्रिटिशांवर टीक लाकडाची निर्यात करण्यासाठी कर लावला. ह्याचे निमित्त साधून ब्रिटीशांनी त्वरित युद्ध घोषित केले. युद्धाचा मानस आधीपासून असल्याने, तश्या तयारीमध्ये असलेल्या ब्रिटिशांना बर्माची राजधानी मंडाले आपल्या अधिपत्याखाली आणावयास फार वेळ लागलाच नाही. तटीय क्षेत्रावर आधीपासूनच ताबा असलेल्या ब्रिटिशांनी बर्माची राजधानी देखील काबीज केली आणि बर्मावर आधिपत्य स्थापन केले.

बर्मावर आधिपत्य झाल्याने राजे थिबॉ आणि राणी सुपायलात ह्यांचे काय करायचे हा प्रश्न होताच. त्या काळी एखाद्या राज्यावर सत्ता प्रस्थापित केल्यानंतर तेथील राजांना स्थलांतर करविणे, किंवा अज्ञातवासात पाठविणे ही प्रथा रूढ होती. श्रीलंकेचे अखेरचे राजे ह्यांना अज्ञातवासामध्ये राहण्यासाठी वेल्लोर येथे पाठविण्यात आले होते, तर बहादूर शाह जफर ह्यांची पाठवणी रंगून येथे करण्यात आली होती. त्यामुळे हीच परंपरा अनुसरून ब्रिटीशांनी थिबॉची पाठवणी लवकरात लवकर करण्यात यावी असा निर्णय घेतला, आणि त्यासाठी, त्याकाळी काहीश्या एकाकी असणाऱ्या रत्नागिरी गावाची निवड केली.

१८८६ च्या एप्रिल महिन्यामध्ये थिबॉ आणि सुपायलात त्यांच्या चार कन्यांसह रत्नागिरीला आले. त्यांना राहण्यासाठी तीस खोल्या असलेला आलिशान बंगला उभारण्यात आला. थिबॉ पॅलेस म्हणून ओळखली जाणारी इमारत आजही रत्नागिरीमध्ये पाहायला मिळते. इथे थिबॉ आणि त्यांचा संपूर्ण परिवार नजरकैदेमध्ये राहत असे. आर्थिक दृष्ट्या देखील ह्या राजपरिवाराची अवस्था अतिशय बिकट होती. ह्या कारणासाठी थिबॉला त्यांच्याकडील बहुमूल्य बर्मीझ माणिके विकून गुजराण करावी लागली होती. ही मौल्यवान माणिके आजही रत्नागिरीतील काही सावकारांच्या ताब्यात आहेत असे म्हटले जाते. ह्या बिकट अवस्थेमध्ये दिवस कंठीत असतानाच १९१६ साली थिबॉ ह्यांना एकाकी मरण आले. रत्नागिरीतील ख्रिस्ती दफनभूमीमध्ये त्यांची लहानशी समाधी बांधण्यात आली.

थिबॉ ह्यांच्या मृत्यूनंतर सुपायलात आपल्या मुलींसह बर्माला परतली. त्यानंतर ह्या आलिशान बंगल्याचे रुपांतर ब्रिटीश सरकारी कार्यालयांमध्ये करण्यात येऊन, कालांतराने येथेच सरकारी पॉलिटेक्निक महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. तेव्हापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत, म्यानमार (बर्मा)वर मिलिटरी राजवट असेपर्यंत बर्माच्या ह्या अखेरच्या राजचे फारसे उल्लेख केले जात नव्हते. पण लोकतंत्र आल्यानंतर, ह्या राजाची आठवण जागती ठेवत, २०१२ साली बर्माचे राष्ट्रपती थेईन सेईन ह्यांनी भारत भेटीसाठी आल्यावर रत्नागिरीला जाऊन थिबॉ ह्यांच्या स्मारकावर आदरांजली वाहिली. थिबॉ ह्यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानाचे सध्या पुनर्निर्माण सुरु असून लवकरच ह्याचे रुपांतर वस्तूसंग्रहालयामध्ये करण्यात येणार आहे.

Leave a Comment