पेट्रोल-डिझेलच्या दरात किरकोळ कपात


नवी दिल्ली – आज सलग दुसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरामध्ये किरकोळ कपात करण्यात आली असून प्रति लिटर ७ पैसे पेट्रोल तर ५ पैशांनी डिझेल स्वस्त झाले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर ७८.३५ रूपये आणि डिझेल ६९.२५ रूपये असा आहे. तर पेट्रोलचा दर मुंबईत ८६.१६ रूपये तर डिझेल ७३.७३ रूपये असा दर आहे.

बुधवारी इंधन दर ६० पैशांनी कमी केल्याचे जाहीर केले. पण तेल कंपन्यांनी दुपारी कोलांटउडी घेत इंधन दरात केवळ एक पैशांची कपात झाल्याचे सांगितले. हा घोळ तांत्रिक चुकीमुळे झाल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले होते. पण देशभरात याप्रकारामुळे संतापाची लाट उसळली होती. सरकारवर विविध राजकीय पक्षांनीही टीकेची झोड उठवली होती.

केंद्र सरकार व तेल कंपन्यांवर सोशल मीडियावरूनही टीका करण्यात आली होती. पेट्रोल दरकपातीबाबत केलेल्या अक्षम्य चुकीबद्दल पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यानंतर दिलगिरी व्यक्त केली. पण तेल कंपन्या इंधनाच्या किमती ठरवतात, त्यामध्ये सरकारचा काहीच हात नसतो, असा दावा प्रधान यांनी केला होता.

Leave a Comment