या पर्यटन स्थळांना भेट दिलीत का?


ज्यांना खाण्याची आवड असते ते नेहमी ‘आता काय नवीन खायचे’ ह्या विचारात असतात. तसेच ज्यांना भटकंतीची आवड असते, त्यांना ‘आता कुठल्या नविन ठिकाणी जायचे’ अस प्रश्न नेहमी पडत असतो. भटकंतीची आपली हौस भागविण्याचा उत्तम पर्याय म्हणजे सतत नवनवीन ठिकाणी प्रवास करीत आपले अनुभव समृद्ध करत राहणे. भारतभरामध्ये अनेक आवर्जून भेट द्यावीत अशी ठिकाणे आहेत. सुट्ट्यांच्या काळामध्ये, किंवा तेथील हवामान पर्यटनाला साजेसे झाले, की ह्या ठिकाणी पर्यटक गर्दी करीत असतात. पण आपल्या देशामध्ये काही ठिकाणे अशी ही आहेत, जी फारशी माहिती नाहीत, जिथे पर्यटकांची गर्दी नाही, कुठला ही कोलाहल नाही. त्यामुळे ह्या ठिकाणांचा समावेश तुम्ही तुमच्या ‘बकेट लिस्ट’ मध्ये अवश्य करू शकता.

जमशेदपूर पासून ६५ किलोमीटर अंतरावर असलेले अमादुबी हे ठिकाण, भुर्जपत्रांवर केल्या जाणाऱ्या चित्रकलेकरिता प्रसिद्ध आहे. येथील आदिवासींनी ही कला जोपासली आहे. ह्या चित्रांमधून अनेक पौराणिक कथा चितारल्या गेल्या आहेत. आदिवासी संस्कृती आणि परंपरेचे जवळून अवलोकन करावयाचे असल्यास ह्या ठिकाणाला भेट द्यावी. येथून नजीकच असलेली राजबाडी, त्रिविनेश्वर, दशभुज, पंच पांडव इत्यादी प्राचीन मंदिरे पाहण्याचा अनुभव, तसेच येथील खास पदार्थांचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. टसर सिल्क पासून बनविलेल्या शाली, स्कार्फ, ढोक्रा कलाकृती येथील खासियत आहेत.

परुळे आणि भोगवे ही ठिकाणे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत. सूर्यमंदिराच्या सभोवार वसलेले परुळे एकेकाळी पारुल्य ग्राम म्हणून ओळखले जात असे. येथील सूर्य मंदिरातील मूर्तीच्या चरणांना स्पर्श करूनच सूर्य अस्ताला जात असे. ह्या मंदिराचे पुनर्निर्माण सुरु असल्याने हा अनुभव आता घेता येत नसला, तरी हे मंदिर मात्र देखणे आहे, ह्यात शंका नाही. परुळे पासून सहा किलोमीटर अंतरावर भोगवे बीच आहे. येथील सागरामध्ये डॉल्फिन्सचे वास्तव्य असल्याने अधून मधून डॉल्फिन्सचे दर्शन होते. येथे येऊन ग्रामीण जीवनाचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. तसेच देवराईमध्ये बर्ड वॉचिंग, सूर्यास्ताचे मनोरम दृश्य पाहण्यासाठी किल्ले निवाती येथे फेरफटका आणि अस्सल मालवणी पदार्थ ह्यांचा आनंद येथे मिळतो.

छत्तीसगडचे ‘शिमला’ म्हणून ओळखले जाणारे मैनपत निसर्गाचा वरदहस्त लाभलेले आहे. घनदाट अरण्ये, झुळझुळ वाहणारे झरे, सभोवताली हिरवागार शृंगार ल्यायलेले हे हिल स्टेशन समुद्र सपाटी पासून १००० मीटरच्या उंचीवर वसलेले आहे. येथे मांझी माझवार, कन्वर आणि पहाडी कोरवा जमातींचे लोक राहतात. येथे तिबेटी रहिवासी देखील मोठ्या प्रमाणावर स्थायिक झाले असून, ह्या ठिकाणाला मिनी तिबेटही म्हटले जाते. येथे असलेल्या टायगर पॉइंट, फिश पॉइंट, मेहता पॉइंट इत्यादी ठिकाणांना भेट द्यावी. तसेच तिबेटन रेफ्युजी कँपला भेट देऊन येथील तिबेटन पदार्थ अवश्य चाखावेत. थुप्का, मोमो आणि बांबू राईस येथील खासियत आहेत.

Leave a Comment