डिजिटल दरोडेखोरीत भारत अन्य देशांपेक्षा पुढे


डिजिटल बँकिंगचे खुल्या मनाने स्वागत करणाऱ्यांसाठी सावध करणारी माहिती एका वित्तीय कंपनीने पुढे आणली आहे. डिजिटल दरोडेखोरीत भारत अन्य देशांपेक्षा पुढे असल्याचे या कंपनीने म्हटले आहे.

एफआयएस या पेमेंट कंपनीने जगभरात केलेल्या सर्वेक्षणानंतर हा अहवाल प्रसिद्ध केला असून त्यात ही माहिती दिली आहे. गेल्या वर्षी 18 टक्के भारतीय ग्राहकांनी डिजिटल बँकिंगमध्ये फसवणूक झाल्याच्या तक्रारी केल्या. या सर्वेक्षणात सहभागी असलेल्या अन्य देशांपेक्षा हे प्रमाण जास्त होते. जर्मनीमध्ये हेच प्रमाण 6 टक्के तर ब्रिटनमध्ये 8 टक्के ग्राहकांनी बँकिंगमध्ये फसवणूक झाल्याची तक्रार केली, असे कंपनीने म्हटले आहे.

अशा प्रकारच्या फसवणूक होणाऱ्यांचे वय 27 ते 37 वर्षे होते. या वयोगटातील प्रत्येक चारमधील एका व्यक्तीने फसवणुकीची तक्रार केली.

देशातील बँकांच्या 58 टक्के ग्राहकांचा संपर्क आता डिजिटल झाला असून त्यात जुने ग्राहक पुढे आहेत. उदाहरणार्थ 53 वर्षांपेक्षा अधिक वयाचे ग्राहक बँकिंग सेवांचा लाभ घेण्यासाठी लॅपटॉप व स्मार्टफोनचा वापर करतात, असेही या अहवालात म्हटले आहे.

डिजिटल तंत्रज्ञानात किती वेगाने सुधारणा होत आहे आणि बँकांना आपल्या ग्राहकांचे अधिक समाधान करण्याची गरज आहे हे या अहवालातून दिसून येते, असे एफआयएस (भारत) कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रामास्वामी वेंकटचलम यांनी सांगितले.

Leave a Comment