जास्त ‘स्क्रीन टाईम’चे परिणाम मुलांच्या तब्येतीवर


अति टीव्ही पाहणे हे मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासाकरिता हानिकारक आहे हे आपणा सर्वांनाच ठाऊक आहे. अलीकडे प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट आणि सेलिब्रिटी ऋजुता दिवेकर ह्यांनी ह्याबद्दलचे आपले अनुभव आणि मते टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये व्यक्त केली आहेत. आपल्या अनुभवाबद्दल बोलताना ऋजुता दिवेकर म्हणाल्या, की परदेशी एके ठिकाणी हॉटेलमध्ये वास्तव्य करीत असताना, हॉटेलच्या व्यवस्थापनाने त्यांना, तेथे एका शाळेच्या सहलीत सहभागी झालेली मुले राहावयास येणार असल्याचे सांगितले. त्यावर ऋजुता आणि त्यांच्या सहकऱ्यांनी, त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण होणार नाही असे आश्वासन हॉटेलच्या व्यवस्थापनाला दिले. काही वेळानंतर हॉटेलच्या लॉबीमध्ये दिवेकर ह्यांनी सहलीसाठी आलेली शंभर मुले बसलेली पाहिली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, एकाही मुलाच्या तोंडातून आवाज नव्हता. सगळी जणे आपापल्या फोन वर चॅट करण्यात गुंगलेली होती. ज्यांच्या हातामध्ये फोन दिसत नव्हते, ते टीव्हीवरील कुठला तरी कार्यक्रम पाहण्यात दंग होते. एका खोलीत शंभर मुले आणि चिडीचूप शांतता, हे दृश्य आपल्याकडे भारातात पाहायला मिळणे ही जरा अवघड गोष्ट आहे. पण ह्यावरून मुले मोबाईल किंवा टीव्हीमध्ये किती गुंतून पडली आहेत, हा ऋजुताचा अनुभव विचार करायला लावणारा आहे.

हे लोण आता हळू हळू आपल्याकडेही पसरत चालले आहे. अगदी वर्ष-दीड वर्षाच्या मुलाला देखील घरात असताना, किंवा बाहेर घेऊन जाताना, मूल कंटाळून जाऊ नये, म्हणून त्याच्या हातामध्ये टॅब किंवा फोन देणारे मायबाप आता आपल्याकडेही सर्रास दिसू लागले आहेत. पण मनोविज्ञान म्हणते, की एखाद्या गोष्टीचा कंटाळा आल्याशिवाय दुसरे काही तरी करून बघायची इच्छा होत नाही. त्यामुळे मुले जर एका कामाला कंटाळली नाहीत, तर दुसरे काही तरी करून बघण्याची त्यांची कल्पनाशक्ती विकसित कशी होणार? त्यामुळे मुलांना सतत टीव्ही किंवा मोबाईल हातात देण्यापेक्षा त्यांना निरनिराळ्या उद्योगांत व्यस्त करणे आवश्यक आहे, असा ऋजुता म्हणतात.

टीव्हीसमोर दिवसेंदिवस बसून राहणे, किंवा हातातल्या मोबाईलवर, टॅबवर काही न काही करीत राहणे, ह्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल मर्यादित झाली आहे. बाहेर खेळायला जाण्यापेक्षा कॉम्प्यूटर गेम्स खेळण्यामध्ये मुले मग्न असतात. तसेच बसल्या बसल्या चॉकलेट्स, बिस्किटे, ब्रेड किंवा तत्सम पदार्थ, चिप्स, कोल्ड ड्रिंक्स इत्यादी पदार्थ सोबतीला असतातच. ह्यामुळे मुलांना अगदी लहान वयापासूनच लठ्ठपणासारख्या विकाराला तोंड द्यावे लागत आहे. तसेच प्रोसेस्ड अन्नपदार्थांचे सेवन आहारामध्ये जास्त असल्याने शरीराला पोषक आहार कमी प्रमाणात मिळतो. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. परिणामी वारंवार उद्भविणाऱ्या आजारांमुळे दवाखान्यात खेपा सुरु होतात. भारतामधील मुलांमध्ये ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीझ’ (NAFLD) चे प्रमाणही वाढताना पाहायला मिळत आहे. चुकीचे खानपान आणि व्यायामाचा अभाव ह्यामुळे हा विकार उद्भवितो. जर ह्याकडे वेळीच लक्ष दिले गेले नाही, तर ह्याचे गंभीर दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.

ह्या सर्व समस्यांवर उपाय अगदी साधा आहे, आणि आपल्यापैकी बहुतेक पालकांना ठाऊकही आहे. आहारामधून प्रोसेस्ड, साखर असलेले अन्नपदार्थ कमी करणे, आपल्याकडे मिळणाऱ्या, पिकविल्या जाणाऱ्या ताज्या भाज्या, फळे भरपूर खाणे, आणि जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा घरामध्ये टीव्ही किंवा मोबाईल समोर न बसता, घराबाहेर, खुल्या हवेमध्ये खेळायला जाणे. आजकाल शाळेचे किंवा कॉलेजचे गृहपाठ देखील बहुतेकवेळी कॉम्प्यूटरच्या मदतीने करावे लागतात, त्यामुळे ‘स्क्रीन टाईम’चे वेळापत्रक आखताना गृहपाठाचा वेळ देखील लक्षात घ्यायला हवा, आणि त्यामुळेच घरामध्ये बसून राहण्यापेक्षा, घराबाहेर जाऊन खेळणे, सायकल चालविणे, किंवा शारीरिक व्यायाम होईल अशी कोणतीही अॅक्टीव्हिटी मुलांनी अवलंबिण्याबद्दल पालकांनी आग्रही असायला हवे, असे दिवेकर म्हणतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment