६० पैशांनी नाही तर अवघ्या एक पैशाने स्वस्त झाले पेट्रोल


मुंबई – आज सकाळी तेलकंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दररोज वाढणाऱ्या किंमतीला वैतागलेल्या नागरिकांना दिलासा दिला. पण हा दिलासा क्षणिक ठरला. बुधवारी तेलकंपन्यांनी पेट्रोल ६० पैसे आणि डिझेल ५६ पैशांनी स्वस्त झाल्याचे जाहीर केले. पण प्रत्यक्षात पेट्रोलच्या दरात फक्त एक पैशाचीच कपात झाली आहे. ६० पैशांची कपात इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर एका चुकीमुळे दिसत होती. कंपनीच्या चूक लक्षात येताच त्यांच्याकडून स्पष्टीकरण देण्यात आले आणि फक्त एका पैशाचीच कपात पेट्रोलच्या दरात केल्याचे जाहीर करण्यात आले आहे. देशातील नागरिकांमधून तेल कंपन्यांच्या या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे.

स्पष्टीकरण देताना इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले की, पेट्रोल आणि डिझेलचे दर पोस्ट करताना एक तांत्रिक चूक झाली होती. ती आता दुरूस्त करण्यात आली आहे. आजच्या पेट्रोलियम पदार्थाच्या दरात काही मोठा बदल झालेला नाही. सध्या दिल्लीत एक लिटर पेट्रोलसाठी ७८.४२ आणि मुंबई ८६.२३ पैसे असा दर आहे. तर डिझेल दिल्लीत ६९.३० रूपये तर मुंबईत ७३.७८ रूपये प्रति लिटर असा दर आहे.

Leave a Comment