पाकिस्तानकडे केवळ १० आठवडे पुरेल इतकीच परकीय गंगाजळी


पाकिस्तानी अर्थव्यवस्था डबघाईला आली असून आयात वाढत चालली आहे. मात्र केवळ १० आठवडे पुरू शकेल इतकीच रक्कम पाकिस्तानच्या परकीय गंगाजळीत शिल्लक राहिली असल्याचे समजते. जागतिक बँकेने या संदर्भात पाकिस्तानला ऑक्टोबर मध्येच इशारा दिला होता आणि कर्जफेडीबाबत योग्य उपाययोजना आखण्याची सूचना दिली होती.

आंतरराष्ट्रीय मुद्रा बाजारात पाकिस्तानी रुपयाची जोरदार घसरण सुरु असून सध्या १ डॉलरची किंमत १२० पाकिस्तानी रुपयांवर पोहोचली आहे. पाकिस्तान कडे १०.३ अब्ज डॉलर्स इतकीच गंगाजळी आहे. कर्ज फेडीसाठी चीनपुढे हात पसरवा लागला आहेच आणि चीन कडून घेतलेल्या कर्जाची रक्कम आत्ताच ५ अब्ज डॉलरवर गेली आहे. त्यातच जुलैमध्ये देशात सार्वत्रिक निवडणुका होत आहेत.

पाकिस्तानात परदेशातून पैसा पाठविणाऱ्या स्वदेशी लोकांचे प्रमाण कमी होत असून पैशाचा हा ओघ आटत चालला आहे. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यावर त्यांनी पाकिस्तानला अमेरिकेकडून केले जाणारे आर्थिक सहाय्य घटविले आहे त्याचाही फटका देशाला बसला असून देशात आयकर भरणाऱ्याचे प्रमाण घटून ते १२ लाखांवर आले आहे. यावर्षी ही संख्या आणखी कमी होणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment