‘हा’ चहावाला चहा विकून चालवतो तब्बल ७० मुलांची शाळा


एका चहावाल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ४४ व्या ‘मन की बात’ या कार्यक्रमातून तोंडभरून कौतुक केल्यानंतर संपूर्ण देशात या चहावाल्याची चर्चा होत आहे. हा चहावाला चहा विकूनतब्बल ७० मुलांची शाळा मोफत चालवतो. त्यांच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी हे वसती भागातील झोपड्यात राहणारी आहेत.

डी. प्रकाश राव असे या चहावाल्याचे नाव असून राव हे ओडिशातील कटक येथे राहतात आणि तेथेच ते चहाचे दुकानही चालवतात. ‘आशा आस्वासन’ या नावाने त्यांनी शाळा सुरू केली आहे. वसती भागात आणि झोपड्यांत राहणाऱ्या मुलांसाठी ते त्यांच्या कमाईच्या ५० टक्के रक्कम ही खर्च करतात. त्याचबरोबर त्यांनीच या शाळेत शिकण्यासाठी येणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची, प्रकृतीची आणि भोजनाची जबाबदारीही घेतली असल्याचे मोदी म्हणाले. राव हे गेल्या पाच दशकांपासून चहा विकत असून ते आपल्याला, आपल्या समाजाला आणि संपूर्ण देशाला प्रेरणा देणारे आहेत.

यावर राव म्हणतात, माझ्या कामाची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली आणि मन की बात या त्यांच्या कार्यक्रमात त्यांनी चार वेळा माझे नाव घेतले. एक रस्त्याच्या कडेचा चहा विक्रेता म्हणून हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. नुकतेच कटक येथे जाहीर सभेला मोदी यांनी संबोधित केले. त्यांनी यानंतर मी आणि माझ्या शाळेच्या विद्यार्थ्यांसोबत तब्बल १८ मिनिटे घालवली, असे भारावून गेलेले राव म्हणाले.

राव यांना जेव्हा विचारण्यात आले, की चहाच्या दुकानापासून मिळणाऱ्या एवढ्या कमी कमाईत शाळा कशी काय चालवतात ? राव यावर म्हणाले, की त्यांच्या दुकानातून होणाऱ्या कमाईतून ते ५० टक्केपेक्षाही अधिक भाग वस्ती भागातील मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात आणि उरलेला त्यांच्या कुटुंबीयांवर खर्च करतात. गेल्या १७ वर्षांपासून हे सर्व सुरू झाले. माझ्या स्वतःच्या घरात मी शाळा सुरू केली. दोन रुम येथे होत्या. यातील एक रुम मी माझ्या कुटुंबासाठी वापरायचो आणि दुसरी शाळा चालवण्यासाठी वापरायचो. मला मुलांच्या पालकांकडूनच सुरुवातीला विरोध झाला. कारण ही मुले त्यांना घरगुती कामात मदत करून त्यांच्या कुटुंबीयांसाठी कमाई करत. यानंतर राव म्हणाले, मला जे लोक विरोध करत, तेच आता, त्यांची मुले महाविद्यालयात जात असल्याचे पाहून आणि उच्च शिक्षण घेत असल्याचे पाहून आनंदी आहेत.

मला माझ्या वडिलांमुळे शिष्यवृत्ती मिळूनही शिक्षण सोडावे लागले, दुसऱ्या जागतिक महायुद्धातही त्यांनी भाग घेतला होता. क्षमला शाळेत जाण्यासाठी दुसऱ्या जागतिक महायुद्धातही कधीही प्रोत्साहन दिले नाही. त्यांच्या चहाच्या दुकानावर मला मदत करावीच लागली. राव यांनी शाळा चालवण्यासोबतच आतापर्यंत तब्बल २१४ वेळा रक्तदान केले आहे. तर १७ वेळा प्लेटलेट्सचे दान केले आहे. आशियातील सर्वाधिक वेळा रक्तदान करणारे ते व्यक्ती असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. कटकमधील एससीबी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील विद्यार्थ्यांना ते मोफत गरम पाणी पुरवतात आणि दुधही गरम करून देतात.

त्यांना त्यांच्या समाजिक कार्याबद्दल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कारही मिळालेले आहेत. त्यांनी गेल्या ३० वर्षांपूर्वी एससीबी महाविद्यालयाच्या अॅनाटॉमी विभागाला देहदानही केले आहे. त्यांच्या मृत्यू पश्चात हे महाविद्यालय त्यांचा देह घेईल आणि त्याचा एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांसाठी वापर करेल.

Leave a Comment