जाणून घेऊ या दिल्ली मेट्रोच्या नवीन ‘मॅजेन्टा लाईन’ बद्दल


दिल्ली मेट्रोची नव्याने सुरु होत असलेली ‘मॅजेन्टा लाईन’ आता सामान्य जनतेसाठी खुली होत आहे. ही मेट्रो लाईन इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय हवाईपत्तनाच्या डोमेस्टिक टर्मिनल पर्यंत असणार आहे. गुरूग्राम ते नोईडा दरम्यानचा प्रवास ह्या नव्या मेट्रो मार्गामुळे अवघ्या पन्नास मिनिटांचा होणार आहे. दिल्ली शहराचा ‘आउटर रिंग रोड’ ह्या मेट्रोने जोडला जाणार असून, शहरातील प्रमुख शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे ह्या मेट्रो मार्गामुळे सहज शक्य होणार आहे. ह्या नव्या ‘मॅजेन्टा लाईन’ बद्दल अधिक माहिती खास ‘माझा पेपर’च्या वाचकांसाठी.

ह्या मेट्रो स्टेशन मार्गावरील जनकपुरी पश्चिम ह्या स्थानकावर भारतातील सर्वात मोठा ‘एस्केलेटर’ असणार आहे. ‘फायनॅन्शियल एक्स्प्रेस’ ने दिलेल्या वृत्तानुसार ह्या एस्केलेटरची उंची १५.६ मीटर असून, ह्याची लांबी ३५.३ मीटरची आहे. तब्बल २६ टन वजन असलेला असा हा विशालकाय एस्केलेटर आहे. दिल्ली मेट्रोच्या नव्या ‘मॅजेन्टा लाईन’ ला ‘कॉरीडोर ऑफ नॉलेज’ म्हटले आहे, कारण दिल्लीतील बहुतेक सर्व प्रमुख शैक्षणिक संस्थांना जोडणारा हा रेल्वे मार्ग आहे. ह्या मार्गावर दिल्ली एनसीआर ( नॅशनल कॅपिटल रीजन ) मद्धे असणारी चार प्रमुख विद्यापीठे, म्हणजेच जवाहरलाल नेहरू युनव्हर्सिटी, आयआयटी, जामिया मिलीया विद्यापीठ, अॅमिटी इत्यादी महत्वपूर्ण शैक्षणिक संस्था जोडल्या जाणार आहेत. ओखला पक्षी अभयारण्य देखील याच मार्गावर असणार आहे.

ह्या मार्गावरून सध्या २४ ट्रेन्स धावणार असून, काही काळाने हा आकडा २६ पर्यंत जाणार आहे. रहदारीच्या वेळी दर पाच मिनिटे पंधरा सेकंदांच्या अंतराने ट्रेन्स ये-जा करणार आहेत. जर प्रवाश्यांची संख्या वाढली, तर हा अवधी आणखी कमी करुन ट्रेन्सची फ्रिक्वेन्सी वाढविली जाण्याचा विचार आहे. नोईडा ते गुरूग्राम दरम्यानचा प्रवास करण्यासाठी पूर्वी दीड ते दोन तासांचा अवधी लागत असे. गर्दीच्या वेळी, वाहतुकीचा खोळंबा झाल्यास हा वेळ आणखी लांबत असे. पण या नव्या मेट्रो मार्गाने मात्र हा अवधी अर्ध्यावर आणून ठेवला आहे. आता नोईडा ते गुरुग्राम दरम्यानचा प्रवास केवळ पन्नास मिनिटांमध्ये करता येणे शक्य होणार आहे.

ह्या मार्गावरील हौज खास हे स्टेशन दिल्लीमधील संपूर्ण मेट्रो नेटवर्कमधील सर्वात जास्त जमिनीच्या पातळीखाली असणारे स्टेशन आहे. हे स्टेशन ह्या नव्या मेट्रो मार्गावर असून, ते जमिनीखाली पंचवीस मीटर खोलीवर आहे. ट्रेन्सची उत्तम फ्रिक्वेन्सी असणारा, अनेक महत्वपूर्ण ठिकाणांना जोडणारा हा नवा मेट्रो मार्ग दिल्लीमध्ये मेट्रो प्रवास अधिक जलद आणि सोयीचा करणारा ठरेल ह्यात शंका नाही.