आवर्जून अनुभवायला हवा इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे


पंतप्रधान मोदी याच्या हस्ते रविवारी उदघाटन झालेला पंजाब, हरियाना, उत्तराखंड,, राजस्थान, हिमाचल राज्यात जाण्यासाठी दिल्लीमध्ये येण्याची गरज संपविणारा इस्टर्न पेरिफेरल एक्स्प्रेस वे देशातील महत्वाचा आणि अनोखा महामार्ग बनला असून या महामार्गावरची सफर पर्यटनाचा आनंद देणारा ठरणार आहे कारण अनेक प्रकारे हा महामार्ण अन्य रस्त्यांपेक्षा वेगळा ठरला आहे.

मुख्य म्हणजे या महामार्गामुळे अन्य राज्यात जाण्यासाठी येणाऱ्या वाहनांची दिल्लीतील गर्दी कमी होणार आहेच पण देशातला हा पहिलाच ग्रीन आणि स्मार्ट एक्स्प्रेस वे आहे. १४ लेन असलेल्या या रस्त्यासाठी ११ हजार कोटी रुपये खर्च केला असून ९३७५ कामगारांनी तो विक्रमी ५०० दिवसात बांधून पूर्ण केला आहे. या रस्त्यावर ४ मोठे पूल, ४६ छोटे पूल, ८ रेल्वे पूल बांधले गेले आहेत. महामार्ग प्रवाशांना आनंददाई ठरावा यासाठी ४० कारंजी आणि गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, कुतुबमिनार, जालियानवाला बाग, अशी ३२ स्मारके उभारली गेली आहे. विशेष म्हणजे १७० फुटी टोल नाका बनविला गेला आहे आणि तेथे डिजिटल आर्ट गॅलरी, जरुरी सूचना दिल्या जाणार आहेत.


या महामार्गावर ८ सोलर प्लँट बसविले गेले असून त्यातून ४ मेगावॉट वीज तयार होणार आहे. दर ५०० मीटरवर वॉटर हार्वेस्टिंगची सुविधा असून दिल्ली मेरठ हा ४ ते ५ तासांचा प्रवास ४५ मिनिटात करता येणार आहे. ओव्हरस्पीड ने जाणाऱ्या वाहनाचे ऑटो चलन केले जाणार आहे आणि एक्स्प्रेस वे च्या बाहेर पडल्यावर हा दंड वसूल केला जाणार आहे. रस्त्याकडेला पेट्रोल पंप, मोटेल्स, रेस्ट एरीया, वॉशरूम्स, दुकाने, रेस्टोरंट, रिपेअर स्टेशन सुविधा दिली गेली आहे. रस्त्यावर अडीच लाख झाडे लावली गेली आहेत. तसेच सीसीटीव्ही, व्हीआयडीएस, फायबर ओप्टीक नेटवर्क सुविधा आहे यामुळे कंट्रोल रूम ला त्वरित सूचना मिळू शकणार आहेत.