ही आहे ब्रिटीश शाही घराण्यातील चिमुरड्यांची नॅनी


ब्रिटीश शाही घराण्याचे राजपुत्र प्रिन्स विलियम आणि त्याची पत्नी केट मिडलटन ह्यांना आता तीन अपत्ये आहेत. ह्या तीन अपत्यांचा सांभाळ करताना या शाही दाम्पत्याला आपल्या इतर सामाजिक, राजकीय जबाबदाऱ्या देखील पार पाडायच्या असतात. ह्यामध्ये अनेक शाही समारंभ, परदेशगमन, तेथील राजकीय नेत्यांच्या गाठी भेटी, शाही कौटुंबिक समारंभ ह्या आणि अश्या अनेक कार्यक्रमांचा समावेश असतो. ब्रिटीश राजघराण्याचे, तेथील सामान्य जनतेला कौतुक आहे आणि अभिमानही. त्यामुळे जनतेच्या सेवेमध्ये कुठेही कमी न पडण्याचे प्रयत्न शाही खानदानाच्या प्रत्येक सदस्याकडून नेहमीच केले जात असतात. मात्र त्यामुळे मुलांसाठी पुरेसा वेळ शाही दाम्पत्याला देणे काहीसे कठीण होऊन जाते. अश्यातच मुलांची देखभाल करण्यासाठी नॅनीची गरज भासते.

सुरुवातीला विलियम आणि केट ह्यांनी त्यांच्या मुलाची, राजपुत्र जॉर्जच्या संगोपनाची जबाबदारी स्वतःच उचलण्याचे ठरविले होते. मात्र जसजश्या जबाबदाऱ्या वाढू लागल्या आणि जॉर्ज नंतर आणखी एका कन्येचे आणि त्यापाठोपाठ एका मुलाचे आगमनही झाले, त्यानंतर मात्र विलियम आणि केट ह्यांनी मुलांच्या संगोपनासाठी नॅनीची निवड करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी ह्या कामी मारिया टेरेसा ट्युरीयन बोरॅलो हिची निवड केली. मारियाने जगातील सर्वात नामांकित समजल्या जाणाऱ्या ट्रेनिंग स्कूलमधून प्रशिक्षण घेतले आहे. मारिया मूळची स्पॅनिश असून, तिचा लहान मुले सांभाळण्याचा अनुभव अनेक वर्षांचा आहे. मारिया विलियम आणि केट सोबत त्यांच्या केंसिंग्टन पॅलेस ह्या निवासस्थानी राहत असून, शाही भेटींच्या निमित्ताने विलियम, केट आणि त्यांच्या मुलांसोबत प्रवासही करते. २०१६ साली विलियम आणि केट औपचारिक भेटीसाठी कॅनडाला गेलेले असताना मारिया देखील त्याच्या सोबत गेली होती. तसेच पोलंड, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियाच्या औपचारिक भेटींच्या दरम्यानही मारियाही शाही परिवारच्या सोबत होती.
मारियावर शाही घराण्यातील छोट्या पण महत्वाच्या व्यक्तींच्या संगोपनाची जाबाबदारी आहेच, पण त्या सोबत त्यांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी देखील तिची आहे. ह्या करीता मारियाला अनपेक्षितपणे उद्भाविणारे धोकादायक प्रसंग सक्षमपणे हाताळण्यासाठी खास ट्रेनिंग देण्यात आले आहे. त्यामुळे ‘डिफेन्सिव्ह ड्राव्हिंग’ पासून ते कुठलीही इमर्जन्सी उद्भविल्यास ती कशी हाताळायची ह्याचे प्रशिक्षण मारियाला देण्यात आले आहे.

मारियाचे प्रशिक्षण ‘नॉरलंड स्कूल’ येथे झाले असून, नॅनी होण्याचे प्रशिक्षण देणारी ही जगातील सर्वात नामांकित संस्था आहे. ह्यामध्ये दर वर्षी नव्वद विद्यार्थ्यांची निवड केली जाते. नॅनी बनण्यासाठी ह्या संस्थेमध्ये चार वर्षे प्रशिक्षण घ्यावे लागते. चौथ्या आणि शेवटच्या वर्षी ट्रेनीज् ना ‘प्लेसमेंट’ दिली जाते, म्हणजेच चौथ्या वर्षाच्या अखेरीस आपले प्रशिक्षण पूर्ण करून हे विद्यार्थी आपापल्या सेवेच्या ठिकाणी रुजू होतात. या विद्यार्थ्यांना ग्लाउस्टरशर विद्यापीठाची ‘ चाईल्ड स्टडीज’ विषयातील पदवी, तसेच नॉरलंड तर्फे डिप्लोमा दिला जातो. त्यानंतर जगातील अतिशय प्रतिष्ठित परिवारांमध्ये ह्या विद्यार्थांची प्लेसमेंट केली जाते.

विलियम आणि केटचा थोरला मुलगा प्रिन्स जॉर्ज ह्याच्या जन्मानंतर काही काळाने मारीयावर त्याच्या संगोपनाची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यानंतर आता विलियम आणि केटच्या बाकी दोन्ही मुलांची, म्हणजे प्रिन्सेस शार्लोट आणि नवजात प्रिन्स लुईस ह्यांच्या संगोपनाची जबाबदारी देखील मारियावरच असणार आहे. मारिया मुलांच्या शिक्षणातही रस हेत असून तिने जॉर्ज आणि शार्लोट ह्यांना आपली मातृभाषा स्पॅनिश शिकविण्यासही सुरुवात केली आहे. त्यामुळे इंग्रजी आणि फ्रेंच भाषांसोबत मुलांना आणखी एक भाषा शिकण्याची संधी मिळाली आहे. मारियाचे वार्षिक उत्पन्न ७५,००० ते १००,००० पौंड असल्याचे समजते.

Leave a Comment