आता फेसबुक सोडवणार तुमचे धूम्रपानाचे व्यसन


लॉस एंजल्स : तरुणांना धूम्रपानापासून दूर नेण्यात फेसबुकवरील समुपदेशन महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘अ‍ॅडिक्शन’ या मासिकात नुकतेच हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. फेसबुककडून धूम्रपान रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या हस्तक्षेपाची सत्यता पडताळल्यानंतर संशोधकांनी वरील स्पष्टीकरण दिले आहे.

फेसबुकचा ठरावीक कालावधीसाठी धूम्रपान करणाऱ्या तरुणांवर पडणारा प्रभाव कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांनी तपासला. समाजमाध्यमांवरील तंबाखूविरोधी कार्यक्रम व्यसनापासून सहजपणे दूर घेऊन जातो, असे साहाय्यक प्राध्यापक डॅनियल रामो यांनी सांगितले. फेसबुकवर तंबाखू स्थिती प्रकल्प हा ९० दिवसांचा कार्यक्रम संशोधकांनी राबविला.

या कार्यक्रमाचे प्रारूप धूम्रपान सोडण्याच्या दृष्टीने ठरविण्यात आले होते. त्यानुसार दररोजचे समाजमाध्यमांवरील लिखाण, आठवडय़ातील प्रश्नोत्तरांचे सत्र आणि आठवडय़ातील संज्ञात्मक वागणूक सल्ला सत्र यांच्या माध्यमातून सल्लागार समिती धूम्रपानविरोधी कार्य करते. अमेरिकेतील राष्ट्रीय कर्करोग संस्थेने या कार्यक्रमात सहभागी झालेल्या तरुणांना प्रोत्साहन दिले. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या ५०० जणांपैकी ४५ टक्के पुरुष होते. त्यातील ८७ टक्के मोठय़ा प्रमाणावर धूम्रपान करणारे होते.

Leave a Comment