‘थट्टई -वडई सेत्तू’ चा आस्वाद घेऊन पाहू या…


‘चाट’ हा चटपटीत, तोंडाला पाणी आणणारा पदार्थ खरेतर उत्तर भारतीय प्रांताची खासियत. पण हा पदार्थ आता इतका लोकप्रिय झाला आहे, की आपल्या देशामध्ये जवळजवळ सर्वच ठिकाणी हा पदार्थ चाखायला मिळतो, इतकेच काय तर ह्या पदार्थाच्या निरनिराळ्या तऱ्हाही आता सगळीकडे उपलब्ध आहेत. पण तमिळनाडू राज्याच्या सेलम ह्या ठिकाणी मिळणारा ‘थट्टई वडई सेत्तू’ नामक पदार्थ हा केवळ चाटचा भाऊबंदच नव्हे, तर त्याला काकणभर सरस असाच आहे. ज्यांनी ह्या पदार्थाचा आस्वाद घेतला आहे, त्यांना हा पदार्थ पापडी चाट शी मिळताजुळता वाटेल. पण ह्या दोहोतील मुख्य फरक हा, की थट्टई वडई सेत्तू हा पदार्थ अधिक पौष्टिक आहे.

‘थट्टई’ हा भज्यासारखा गोलाकार दिसणारा पदार्थ चण्याच्या डाळीच्या पिठापासून तयार केला जातो. हा पदार्थ तमिळनाडूची खासियत असून, घरा-घरांमध्ये पाहायला मिळतो. दुकानांमध्ये किंवा रस्त्यावरील ठेल्यांवर मिळणाऱ्या थट्टई मध्ये किसलेले बीट, गाजरे, कांदे आणि मसाल्यांचा समावेश असतो. हे सर्व मिश्रण दोन वड्यांच्या मध्ये भरून सँडविचप्रमाणे हा पदार्थ तयार केला जातो. ह्या भाज्यांच्या मिश्रणामध्ये टोमाटो चटणी आणि लसूण घातल्याने हे मिश्रण अधिकच चवदार बनते.

पापडीचाट सम असणारा हा पदार्थ सेलमची खासियत बनला आहे. ह्या पदार्थाचे मूळ येर्कोड भागातील असून, बालाकृष्णन नामक एका व्यापाऱ्याच्या कल्पनाशक्तीतून हा पदार्थ अवतरला आहे. मूळच्या थट्टईला काही तरी वेगळे रूप देण्याच्या प्रयत्नांत हा अतिशय चविष्ट असा पदार्थ तयार झाला, आणि त्याने खूप लोकप्रियताही मिळविली. आज हा पदार्थ आणखीही निरनिराळ्या रूपांमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे भाज्यांच्या मिश्रणात जर कैरी किसून घातली, तर हाच पदार्थ ‘मांगा सेत्तू’ बनतो, तर ओले खोबरे किसून घातले तर हाच पदार्थ ‘थेंगा सेत्तू’ ह्या नावाने चाखावयास मिळतो.

हा पदार्थ बनविणाऱ्या प्रत्येकाची बनविण्याची पद्धत निराळी, चव निराळी, ही देखील ह्या पदार्थाची खासियत म्हणावी लागेल. दोन निरनिराळ्या दुकानांमध्ये मिळणाऱ्या थट्टईची चवही निरनिराळी असते. ह्याचा थेट संबंध ते वापरीत असलेल्या निरनिराळ्या चटण्यांशी आहे. कैरी-आल्याच्या चटणीपासून ते चटपटीत लसूण चटणी पर्यंत अनेक तऱ्हांनी ह्या पदार्थाला एक खास चव देऊ केली आहे.

Leave a Comment