मुंबई ते गोवा जलमार्गावरील प्रवासी क्रूझ सेवा सुरु


आता विमान, ट्रेन आणि रस्त्याशिवाय मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी जलमार्गाचा पर्यायही उपलब्ध झाला आहे. भारतातील सर्वात पहिली प्रवासी क्रूझ सेवा मुंबई ते गोवा जलमार्गावर सुरु करण्यात आली असून बुधवारी यासेवेचे उद्धाटन करण्यात आले. आंग्रिया हे क्रूझ चाचणीसाठी मुंबईच्या किनारपट्टीवर नव्याने उभारण्यात आलेल्या टर्मिनलहून गोव्याला रवाना झाले. क्रूझ गुरुवारी सकाळी गोव्याला पोहोचली.

क्रूझने प्रवास करायचा असल्यास तुम्हाला ७ हजाराहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. क्रूझचा प्रवास रस्ता, रेल्वे आणि विमानाशी तुलना करता सर्वसामान्यांसाठी तसा महागच आहे. सोयीसुविधांसोबत प्रवास करण्याची इच्छा ज्यांना आहे हा प्रवास त्यांनाच परवडणारा असून, कंपनीदेखील अशाच प्रवाशांना टार्गेट करणार आहे.

वॉल्वो बसने मुंबई ते गोवा प्रवास करण्यासाठी १००० ते २५०० रुपये तिकीट आहे. तोच प्रवास विमानाने करायचा असेल तर ३५०० ते ७००० रुपये खर्च करावे लागतात. रेल्वेने प्रवास करायचा असेल आणि त्यातही तेजसने तर तिकीट २६०० रुपये आहे. क्रूझने प्रवास करताना मुंबई-गोव्याच्या किनारपट्टीवरील निसर्गाचा आनंद तर घेता येणारच आहे. पण याशिवाय तुम्हाला दोन वेळचे जेवण आणि नाश्ता मिळणार आहे. तसेच स्विमिंग पूलमध्ये जाऊन पोहण्याचा आनंदही घेऊ शकता. तुमच्या सेवेसाठी क्रूझमधील कर्मचारी नेहमी हजर असतील. तसेच ते तुम्हाला त्या परिसराचे ऐतिहासिक महत्व तुम्हाला सांगतील.

Leave a Comment