चला आस्वाद घेऊ या राजस्थानी दाल बाटी चुर्माचा…


ज्याप्रमाणे पंजाबचे छोले भटुरे खास, त्याचप्रमाणे राजस्थानची खासियत आहे दाल बाटी चुर्मा. अस्सल राजस्थानी असलेला हा पदार्थ बनविण्यास जितका सोपा, तितकाच चवीला अतिशय स्वादिष्ट आहे. हा पदार्थ मुळात कसा बनविला गेला, ह्यामागचा इतिहास मोठा रोचक आहे. ह्या पदार्थाचा जन्म मेवाड प्रांतातला आहे. ‘बाटी’ चा जन्म मेवाड राजघराण्याचे संस्थापक बाप्पा रावळ ह्यांच्या कारकिर्दीमध्ये झाला. गव्हाच्या पीठामध्ये तूप आणि दुध घालून पीठ मळले जाई, व पोळीच्या उंड्याप्रमाणे लहान लहान उंडे( गोळे ) बनवून ते भट्टीमध्ये शेकले जात. त्याकाळी राजपूत वंश आपली सत्ता बळकट करीत असल्याने अनेकदा शत्रूशी युद्ध करावे लागत असे युद्धाच्या काळी खाण्यासाठी खास बाटी तयार करण्यात येत असे. याची कथा अशी, की युद्धावर जाण्यापूर्वी राजपूत योद्धे पीठाचे उंडे करून ते गरम वाळूमध्ये पुरून ठेवत असत. सूर्यास्तानंतर छावणीमध्ये परतल्यानंतर वाळूमध्ये भाजलेले हे उंडे, म्हणजेच बाटी, त्यावर तूप घालून दह्यासोबत किंवा उंटाच्या दुधासोबत खाल्ली जात असे.

त्यानंतर काही काळाने गुप्त राजवंश मेवाड मध्ये स्थायिक झाल्यानंतर बाटीबरोबर दाल बनविली जाण्याची परंपरा जन्माला आली. दालीमध्ये पंचमेल दाल अधिक लोकप्रिय असे. ह्यामध्ये तूर, मूग, मसूर, चणा आणि उडीद ह्या पाच प्रकारच्या पौष्टिक डाळी एकत्र शिजवून त्याची ‘पंचमेल दाल’ बनविली जात असे. ह्या डाळीला जिरे, हिंग, लवंग आणि इतर मसाल्यांची फोडणी दिली जात असे. चुर्मा हा पदार्थ मेवाडच्या गुहीलोल वंशाच्या एका आचाऱ्याने पहिल्यांदा बनविला, तो ही अगदी अनपेक्षितपणे. झाले असे, की बाटी बनविताना आचाऱ्याने त्यामध्ये उसाचा रस घातला. त्यामुळे बाटी एकदम नरम झाल्या. ही कल्पना आवडून त्या घराण्याच्या महिला देखील बाटी गोड रसामध्ये भिजवून ठेऊ लागल्या. त्यामुळे बाटी अतिशय नरम आणि गोड लागू लागल्या. कालांतराने ह्या बाटींचा चुरा करून त्यामध्ये चवीला इलायची पूड घालून बनविला जाणारा चुर्मा अस्तित्वात आला.

अश्या रीतीने राजस्थानची खासियत असलेला दाल-बाटी, चुर्मा मूळचा मेवाड प्रांतातील आहे, हा इतिहास आहे. कालांतराने हा पदार्थ संपूर्ण राजस्थानमध्ये प्रसिद्ध झाला आणि घरा-घरांत बनविला जाऊ लागला. इतकेच काय तर हा पदार्थ मुघल दरबारी देखील जाऊन पाहोचला, मात्र तिथे ह्या पदार्थाचे रूप थोडेसे बदलले आणि हाच पदार्थ ‘बाटला- खीच’ नावाने प्रसिद्ध झाला. बाटला हा बाटी पेक्षा अधिक नरम असून, भट्टीमध्ये भाजण्यापूर्वी बाटले पाण्यामध्ये उकडले जात, व त्यानंतर भाजले जात. त्यासोबत खाण्यासाठी गहू आणि बाजरीची ‘खीच’ बनविली जात असे.

ज्या काळी राजस्थानमध्ये दाल बाटी लोकप्रिय होत होती, त्याच काळी भारतातील अजून एका प्रांतामध्ये ह्याच पदार्थासारखा आणखी एक पदार्थ जन्माला आला होता. त्याकाळी तत्कालीन मगध राज्यात ( सध्याच्या बिहार ह्या राज्यात) ‘लीट्टी-चोखा’ हा पदार्थ लोकप्रिय होत होता. मगध दरबारी अतिशय प्रसिद्ध असलेला हा पदार्थ लीट्टी देखील बाटीप्रमाणे भाजून बनविला जात असे, मात्र लीट्टी बाटीच्या मानाने जास्त नरम असून, त्यामध्ये सातूचे पीठ भरलेले असे. लीट्टीसोबत वांगी, उकडलेले बटाटे, हिरव्या मिरच्या आणि कांदे वापरून बनविलेली भाजी, म्हणजे ‘चोखा’ असे. दाल बाटी आणि लीट्टी-चोखा चवीला पुष्कळ एकसारखे आहेत.

Leave a Comment