या रिक्षाचालकाकडे मिळतात दोन हजाराहूनही अधिक तऱ्हेच्या इडली


इडली म्हटले की गरमागरम वाफाळत्या इडली, त्याच्यासोबत चवदार सांबार आणि खोबऱ्याची चटणी.. असा थाट आपल्या डोळ्यांसमोर येतो. क्वचित इडली अधिक पौष्टिक बनविण्यासाठी त्यामध्ये भाज्या किंवा चण्याची डाळ असते, तर कधी नाचणी सारख्या पौष्टिक पदार्थांपासूनही इडली बनविली जाते, तर कधी चमचमीत मसाला इडलीवर घालून मसाला इडली आवडीने खाल्ली जाते. थोडक्यात काय, तर इडली हा पदार्थ घरोघरी आवडीने खाल्ला जाणारा आहे.

पण चेन्नईचे रहिवासी असणाऱ्या एम एनियावन ह्यांनी मात्र इडलीची संकल्पनाच बदलून टाकली आहे. आपली कल्पनाशक्ती पणाला लावीत, अनेक तऱ्हेने इडली बनवीत, ह्यांनी इडलीचे रूप पालटून टाकले आहे. इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण झालेले, एके काळी रिक्षाचालक म्हणून काम करणारे एनियावन आता प्रसिद्ध इडली विक्रेता बनले आहेत. हा व्यवसाय त्यांना कसा सुचला ह्याची कथा मोठी रोचक आहे.

एक दिवस एनियावन ह्यांना एका महिला प्रवाश्याचे भाडे मिळाले. ह्या महिलेचे नाव चंद्रा असून, तिच्याकडे मोठ्या प्रमाणात इडलीचे पीठ होते. अनेक स्थानिक उपाहारगृहांना इडल्या तयार करून विकण्याचे काम चंद्रा करीत असे. हळू हळू चंद्रा आणि एनियावन ह्यांची चांगली ओळख झाली, आणि इडल्या पोहोचविण्यासाठी चंद्रा एनियावन ह्यांच्या रिक्षातून ये-जा करू लागली. तिचा उत्तम चालणारा व्यवसाय पाहून एनियावन ह्यांनी प्रेरणा घेतली आणि ‘मल्लीपू इडली’ ह्या नावाने स्वतःचे इडलीचे दुकान सुरु केले.

‘मल्लीपू इडली’ ह्या उपाहारगृहामध्ये नेहमीच्या इडली पेक्षा वेगळ्या प्रकारच्या इडली ग्राहकांना उपलब्ध करून देण्याचा एनियावन ह्यांचा प्रयत्न होता. कालंतराने त्यांच्या ह्या प्रयत्नांना यश आले, आणि आजच्या तारखेला त्यांच्या उपाहारगृहामध्ये तीस हूनही अधिक तऱ्हेच्या इडली चाखण्यास मिळतात. इतकेच नाही, तर इडलीच्या एकूण दोन हजारांच्या वर तऱ्हा एनियावन ह्यांना अवगत आहेत. १२४.८ किलो वजनाची इडली तयार करून एनियवान ह्यांनी गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये विक्रम नोंदविण्याचा यशस्वी प्रयत्न केला.

आपल्या मुलांनी पिझ्झा खाण्याचा हट्ट धरल्यावर इडलीचे पीठ वाफवून त्यावर थोडे ‘पोरियल’ घालून एनियावन ह्यांना ‘पिझ्झा इडली’ तयार करण्याची कल्पना सुचली. तसेच एनियावन ह्यांची ‘कोकोनट इडली’ देखील प्रसिद्ध आहे. ह्यामध्ये इडलीच्या पीठामध्ये पाणी न घालता नारळाचे पाणी घातले जाते. आपली आजी ह्या प्रकारे ‘आप्पम’ चे पीठ बनवीत असल्याचे एनियावन सांगतात. सारखी त्याच त्याच प्रकारची इडली खाणे कंटाळवाणे होऊन जाते. त्यामुळे नवनवीन तऱ्हा असल्या की खाणाऱ्यालाही काहीतरी वेगळे खाऊन पाहिल्याचे समाधान मिळत असल्याचे एनियावन सांगतात. त्यांच्या ह्या नाविन्यपूर्ण व्यवसायाने खूपच प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळविली असून, निरनिरळ्या इडली बनविण्याच्या यशस्वी प्रयोगांबद्दल एका अमेरिकन विद्यापीठातर्फे एनियावन ह्यांना ‘डॉक्टरेट’ बहाल करण्यात आली आहे. ‘मल्लीपू इडली’ ह्या ठिकाणी केवळ तिखट किंवा गोड इडलीच नाही, तर मिकी माऊस इडली, कुंगफु पांडा इडली, निरनिरळ्या भाज्या घालून बनविलेल्या इडली, अश्या निरनिराळ्या प्रकारच्या इडली चाखावयास मिळतात.

Leave a Comment