अवयवदानाच्या मोहीमेला बळ देणारा ‘बकेट लिस्ट’


मरणोपरांत एखाद्या व्यक्तीने अवयवदान केल्यामुळे अनेकांना जीवनदान मिळू शकते. त्यामुळेच सरकार आणि खाजगी संस्थांच्या वतीने सध्या अवयवदानाची मोहीम जोरदारपणे राबवली जात आहे. त्याच मोहिमेला बळ देणारा चित्रपट म्हणजे बकेट लिस्ट. पण फक्त अवयवदानच नव्हे तर संसारात रमलेली एक स्त्री तीला हृदय देणा-या युवतीच्या अपूर्ण इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कशी धडपड करते आणि त्यात तिला तिच्या पती मुलांसहित सासू सासरे कसे मदत करतात हे उत्कृष्टपणे या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहे.

हा बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिलाच मराठी चित्रपट असल्यामुळे हा चित्रपट कसा असेल याची उत्सुकता होती. आपल्या वयाला साजेशी अशी दोन मुलांची आई असलेली मधुरा साने या गृहिणीची भूमिका माधुरीने अत्यंत उत्कृष्टरित्या साकारली आहे आणि हेच या चित्रपटाचे मुख्य आकर्षण आहे.

२१ वर्षाच्या सई या युवतीचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर तिच्या इच्छेनुसार अवयवदान केले जाते. सात जणांचे जीव तिच्या या अवयवदानामुळे वाचतात. मधुराचाही त्यात समावेश असतो. सईचे हृदय मधुराला लावण्यात येते. सात वर्षापर्यंत हे हृदय चांगले काम करील असे डॉक्टर सांगतात. त्यानंतर काहीही खात्री देता येत नाही. पण काही व्यक्ती २०-२० वर्ष जगले असल्याची माहितीही डॉक्टर देतात. पण डॉक्टर हृदय दान केलेल्या सईची माहिती देत नाहीत. मधुरा घरी आल्यानंतर सईच्या कुटुंबाचा शोध घेते आणि धन्यवाद देण्यासाठी तिच्या घरी जाते. सईच्या घरी तिचे आई-वडिल आणि जुळा भाऊ सलील असतो. २१ व्या वाढदिवसापर्यंत सईने काय-काय करायचे याची एक यादी (बकेट लिस्ट) तयार केलेली असते. ज्यात प्रियकराचे चुंबन घेण्यापासून, क्लबमध्ये जाणे, बाईक चालवणे ते बिकीनी घालण्यापर्यंतच्या इच्छा असतात. तिच्या या इच्छा अपूर्णच राहिलेल्या असतात. मधुराला सईचे मित्र ही बकेट लिस्ट देतात. मधुरा त्यानंतर सईच्या इच्छा पूर्ण करण्याचे कसे प्रयत्न करते ही कथा चित्रपटात दाखवण्यात आली आहे.

पूर्णपणे माधुरीला समोर ठेऊन हा चित्रपट लिहिलेला असल्याने माधुरी पहिल्या फ्रेमपासून शेवटपर्यंत वेगवेगळ्या अवतारात समोर येते. एक प्रेमळ गृहिणी, सईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तिची चाललेली धडपड माधुरीने चांगल्या प्रकारे दाखवली आहे. तिने आपल्या वयाचा विचार करून दोन मुलांच्या आईची भूमिका यात साकारली आहे.

माधुरीच्या पतीची मोहनची भूमिका सुनीत राघवनने चांगल्या प्रकारे साकारली आहे. सईच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपडत असलेल्या मधुराला मदत करणे असो वा तिच्या या प्रयत्नामुळे घरात होत असलेल्या वादात मधुराला दरडावणे असो त्याने अत्यंत संयत भूमिका साकारली आहे. वंदना गुप्ते, शुभा खोटे, मधुराची मैत्रीण झालेली रेशम टिपणीस, रेणुका शहाणे, दिलीप प्रभावळकर, प्रदीप वेलणकर, इला भाटे, मिलिंद पाठक, सईचा जुळा भाऊ झालेला सुमेध मुदगलकर यांनी आपल्या भूमिका योग्यरित्या साकारल्या आहेत.

यापूर्वी २०१२ मध्ये बास्केट बॉल खेळावर आधारित ‘अजिंक्य’ आणि २०१३ मध्ये ‘प्रेमसूत्र’ या प्रेमपटानंतर दिग्दर्शक तेजस प्रभा विजय देऊसकर याने आता माधुरीला घेऊन ‘बकेट लिस्ट’ केला आहे. चित्रपटाचे संवाद आणि पटकथा तेजस आणि देवश्री शिवडेकरने लिहिली असून करन चित्रपटाची निर्मिती जोहरच्या धर्मा प्रोडक्शनने केली आहे. छायांकन अर्जुन सोरटे यांचे असून मंदार चोळकर आणि तेजस प्रभा विजय देऊसकर यांच्या गीतांना रोहनने संगीत दिले आहे. तुम्ही जर माधुरीचे चाहते असाल आणि तिचा पहिला मराठी चित्रपट म्हणून पाहाण्याची इच्छा असेल तर हा चित्रपट पाहायला हरकत नाही.