७० वर्षीय सीताराम राजपूत यांनी मिटविली संपूर्ण गावाची पाणीसमस्या !


गहलौर गावातील ‘दशरथ मांझी’ तर सर्वांना ठाऊकच असेल. याच दशरथ मांझीच्या पावलावर पाऊल ठेवत मध्य प्रदेशातील सीताराम राजपूत यांनीदेखील असेच एक कार्य हाती घेत ते पूर्णत्वास नेले आहे. भीषण पाणीटंचाई मध्य प्रदेशातील हडुआ या गावात असल्यामुळे दूरवर जाऊन येथील महिलांना पाणी आणावे लागत असल्यामुळे या समस्येवर तोडगा काढणे गरजेचे होते.

पण कोणताही गावकरी ही समस्या सोडविण्यासाठी पुढाकार घेईना. अशा वेळी सीताराम राजपूत यांनी पुढे येऊन गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सीताराम यांनी सतत पाणीटंचाई सहन करत बसण्यापेक्षा विहीर खोदण्यास सुरुवात करावी असा निर्णय घेत विहीर खोदण्यास सुरुवात केली. दरम्यान, गावक-यांनी सरकारकडेही पाणीटंचाई सोडविण्यासाठी मदतही मागितली होती. पण कोणताही सकारात्मक प्रतिसाद सरकारकडून मिळाला नाही. सरकारची उदासिनता आणि त्यात पाणीटंचाई यामुळे ग्रासलेल्या गावक-यांसाठी सीताराम यांनी विहीर खोदण्याचा निर्णय घेतला. सीताराम यांना अडीच वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर ३३ फूट खोल विहीर खोदण्यात यश मिळाले. गावासाठी विहीर खोदण्याचा निर्णय सीतराम यांनी घेतला तेव्हा गावातील नागरिकांनी त्यांना वेड्यात काढले होते. त्याचबरोबर या कार्यात त्यांच्या कुटुंबियांनीदेखील त्यांनी साथ दिली नाही. पण आज या गावात याच सीताराम राजपूतमुळे सुखासमाधानाचे वातावरण पसरले आहे.