येथे आहे जगातील सर्वात मोठा चांदीचा कलश


देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण असल्याल्या राजस्थानची राजधानी आणि गुलाबी शहर जयपूर येथील सिटी पॅलेस आवर्जून पाहावा असाच आहे. याच महालात जगातील सर्वात मोठा चांदीचा कलश ठेवला गेला आहे. गंगाजलासाठी बनविला गेलेला हा कलश ५ फुट ३ इंच उंच आणि १४ फुट १० इंच घेर असलेला आहे. त्याचे वजन आहे ३४५ किलो.

या कलशाविषयी असे सांगतात, महाराजा सवाई माधोसिंग द्वितीय यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि त्याच्या आदेशाने १८९४ मध्ये राजखजिन्यातून १४००० चांदीची नाणी आगीत वितळवली गेली. त्यापासून चांदीचा मोठा पत्रा बनविला गेला आणि तयार लाकडी साच्यावर तो बसवून कलशाचा आकार दिला गेला. हे काम २ वर्षे चालले होते. या कलशाला झाकण आणि दोन बाजूला हँडल्स आहेत. १९०२ साली हा कलश प्रथम जगासमोर आला. कारण त्यावेळी तो शाही प्रवासासाठी ब्रिटनला नेला गेला होता.

असे सांगतात ज्या जहाजातून हा कलश नेला ते जहाज गंगेच्या पाण्याने धुतले गेले होते. या कलशाची नोंद गिनीज बुक मध्ये असून तो भारतीय कला आणि संस्कृतीचा उत्तम नमुना मानला जातो.

Leave a Comment