तांबेकर वाडा-बडोद्याच्या इतिहासातील एक अनमोल दागिना


गुजरातेतील वडोदरा, किंवा पूर्वीच्या काळच्या बडोद्याचे इतिहासामध्ये वेगळे स्थान आहे. मुघल आणि मराठे ह्यांचा, वेगवेगळ्या वेळी, ह्या शहरावर अंमल होता. दोन्ही राजवटींमध्ये बडोदा शहरामध्ये अनेक वास्तू निर्माण केल्या गेल्या. ह्या वास्तू त्या त्या राजवटींच्या वेळच्या स्थापत्यकलेची उत्तम उदाहरणे आहेत. ह्यातील अनेक वास्तू आजही मोठ्या दिमाखात ह्या शहरामध्ये उभ्या आहेत. ह्याचे उदाहरण म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये उभा असलेला तांबेकर वाडा. एकोणिसाव्या शतकामध्ये ह्या वाड्याचे निर्माण केले गेले. ह्या वाड्याची इमारत लाकडी असून तीन मजली आहे. ह्या इमारतीमध्ये असलेली अनेक सुंदर भित्तीचित्रे, भारतातील सर्वात सुंदर चित्रांमध्ये गणली जात असून, ह्या इमारतीची खासियत आहेत.

बाहेरून ह्या वाड्याचे दर्शन घेतले असता, ही इमारत अतिशय साधी वाटते. ह्या वाड्याच्या बाह्यरूपावरून, हा वाडा वास्तविक इतका भव्य असेल असा अंदाज येत नाही. हा वाडा तांबेकर परिवाराच्या मालकीचा असून हे कुटुंब मूळचे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील तांबवे गावचे होते. अठराव्या शतकामध्ये मराठ्यांनी बडोद्यावर आपली सत्ता कायम केल्यानंतर अनेक मराठी कुटुंबांप्रमाणे तांबेकर कुटुंबही बडोद्याला आले आणि इथेच स्थायिक झाले. तांबेकर हे पेशाने सावकारी करीत असत, म्हणजेच पैश्यांच्या देव-घेवीचा त्यांचा व्यवहार असे. मराठा सैन्याच्या खर्चाचा मोठा भार ताम्बेकारांनी उचलल्यामुळे त्यांना सरकार दरबारी मानाचे स्थान होते.

तांबेकर वाड्याचे निर्माण विठ्ठलराव खंडेराव तांबेकर ह्यांनी करविले. ह्यांना भाऊ तांबेकर ह्याही नावाने ओळखले जात असे. १८४९ ते १८५४ ह्या काळामध्ये, बडोद्याचे नववे महाराज गणपतराव गायकवाड ह्यांचे, भाऊ तांबेकर दिवाण होते. हा वाडा पारंपारिक पद्धतीने बनविला गेला असून, वाड्याच्या मधोमध मोठे अंगण आहे. ह्या अंगणाच्या चहू बाजूंना खोल्या बांधविल्या गेल्या. देवघर आणि शयनकक्षांमधील संपूर्ण भिंतींवर असलेली सुंदर भित्तीचित्रे ह्या वाड्याची शोभा वाढविणारी आहेत. ह्या भित्तीचित्रांमध्ये पुराणातील अनेक कथा मोठ्या कौशल्याने चितारलेल्या आहेत. भगवान कृष्णांची जीवनी, रुक्मिणी हरण, कृष्ण आणि सुदाम्याची कथा, शेषशायी विष्णू अश्या अनेक गोष्टी दर्शविणारी ही भित्तीचित्रे आहेत. तसेच रामायण आणि महाभारतातील अनेक प्रसंग देखील ह्या भित्तीचित्रांमध्ये पाहायला मिळतात. इतिहासातील अनेक महत्वाच्या घडामोडी दर्शविणारी भित्तीचित्रे देखील काही दालनांमध्ये आहेत. ह्यामध्ये मराठ्यांच्या किल्ल्यावर इंग्रजांनी केलेले हल्ले दर्शविणारी चित्रे आहेत. पण सर्वात भव्य आणि सुंदर चित्र आहे, ते व्हिक्टोरियन जीवनशैलीचे दर्शन घडविणारे, युरोपच्या राज्य दरबाराचे.

एकोणिसाव्या शतकामध्ये ब्रिटीश शासनाचा ससेमिरा पाठी लागल्यामुळे भाऊ ताम्बेकारांना हा वाडा सोडून जावे लागले. स्वातंत्र्यचळवळीच्या कार्यकर्त्यांना मदत करीत असल्याने ब्रिटीश शासनाचा रोष भाऊ ताम्बेकारांवर होता. १८७२ साली ताम्बेकारांना बडोद्यातून स्थलांतर करावे लागले. त्यानंतर ह्या वाड्याचे रुपांतर शाळेत करण्यात येऊन लहान मुलांसाठी कलेचे वर्ग येथे होत असत. तेव्हा तिथे येणाऱ्या लहान मुलांनी ह्या वाड्यातील सुंदर भित्तीचित्रे काहीशी विद्रूप करून टाकली. त्यानंतर हा वाडा अनेक वर्षे दुर्लक्षित राहिला. त्यानंतर १९५१ साली भारतीय पुरातत्व विभागाने ह्या वाड्याचा काही भाग आपल्या ताब्यात घेतला. ह्याच भागामध्ये ती प्रसिद्ध भित्तीचित्रे आहेत. बाकी वाड्याचा भाग मात्र आजही दुर्लक्षितच आहे.

Leave a Comment