मुहम्मद घोरीचा पराभव करणाऱ्या वीर महाराणी नायकी देवी


मुहम्मद घोरी ने पृथ्वीराज चौहानचा पराभव करीत ११९२ साली दिल्ली सल्तनतीची पायाभरणी केली हा इतिहास आपल्या परिचयाचा आहे. मात्र तरणचे हे दुसरे युद्ध ११९२ साली जिंकण्याच्या चौदा वर्षांआधी गोव्यामध्ये जन्मलेल्या पण कर्मभूमी गुजरात असलेल्या नायकीदेवी ह्या पराक्रमी राणीने मुहम्मद घोरीचा पराभव केला होता. ह्या राणीच्या पराक्रमाची गाथा इतिहासामध्ये फारशी ऐकिवात नाही, किंवा ही राणी नेमकी कशी होती हे दाखविणारी छायाचित्रे, किंवा तैलचित्रेही अस्तित्वात नाहीत. पण प्रचंड बलशाली असलेल्या घोरीचा पराभव करणारी पराक्रमी राणी होऊन गेली हे वास्तव अभिमानास्पद आहे.

नायकीदेवी ही सोलंकी वंशाच्या अजयपाल राजाची विधवा होती. सोलंकी राजवंशाला गुजरातेतील चालुक्य वंश म्हटले जात असे. महाराजा अजयपाल ह्यांनी फार थोड्या काळाकरिता, म्हणजेच ११७१ पासून, केवळ चार वर्षांसाठी राज्य केले. नायकीदेवी कदंब वंशाचे राजे महामंडलेश्वर परमादी ह्यांच्या कन्या होत्या. राजे अजयपाल ह्यांच्या मृत्युनंतर राणी नायकीदेवींनी राज्यकारभारची जबाबदारी पेलली. त्यावेळी त्यांचे सुपुत्र राजकुमार दुसरे मुलाराजे वयाने अतिशय लहान होते. राणी नायकीदेवींची कारकीर्द अतिशय अल्प काळाची असली, तरी अतिशय प्रभावी होती. ११७८ साई मुहम्मद घोरीने आक्रमण केल्यानंतर राणी नायकीदेवींनी मोठ्या शौर्याने प्रतिकार करीत घोरीला माघारी घालविले होते. ह्या घटनेची नोंद हिंदू आणि इस्लामी इतिहासकारांनी त्यांच्या लेखनामध्ये करून ठेवली आहे.

सोलंकी राजांच्या दरबारी असलेले गुजराती कवी सोमेश्वर ह्यांनी देखील नायकीदेवींच्या पराक्रमाचे वर्णन आपल्या काव्यांमध्ये करून ठेवले आहे. चौदाव्या शतकात होऊन गेलेले जैन अभ्यासक मेरुतुंगा ह्यांच्या ‘प्रबंध चिंतामणी’ ह्या संग्रहामध्ये दुसरे मुलाराजा ह्यांच्या आई असलेल्या नायकी देवी ह्यांनी म्लेंच्छांचा कसा पराभव केला ह्याची शौर्यगाथा वर्णिलेली आहे. माउंट अबू जवळ असलेल्या गदरारघट्टा ह्या ठिकाणी हे युद्ध झाल्याचा उल्लेख आहे. तेराव्या शतकात होऊन गेलेले पर्शियन अभ्यासक मिन्हाज-ए-सिराज ह्यांनी घोरीने उच्छा आणि मुलतान प्रांतामार्गे वाटचाल करून सोलंकी राजवंशाची राजधानी अन्हीलवाडावर आक्रमण केले असल्याचे उल्लेख आहेत. पण नायकीदेवींच्या नेतृत्वाखाली सोलंकी सेनेने घोरीचा प्रभाव केला, आणि घोरीला रिकाम्या हाताने परतावे लागले हाही उल्लेख ह्या लेखनामध्ये आहे. ह्यानंतर मात्र नायकीदेवींच्या कारकीर्दीचा फारसा उल्लेख इतिहासामध्ये सापडत नाही.