‘पर्मनंट’ मेकअप करविताना…


आजच्या काळामध्ये प्रसाधन करविण्याचा कायमस्वरूपी पर्याय ‘पर्मनंट’ मेकअपच्या माध्यमातून उपलब्ध झाला आहे. एकदा पर्मनंट मेकअप करवून घेतला, की वारंवार सौंदर्यप्रसाधने वापरण्याचा त्रास वाचतो हे जरी खरे असले. तरी हा पर्याय निवडण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात घेणे आवश्यक आहे. कारण एकदा पर्मनंट मेकअप केला गेला, की त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे बदल करवून घेणे तितके सोपे नाही.

ज्याप्रमाणे पारंपारिक पद्धतीने गोंदवून घेतलेले टॅटू सहजी काढू टाकता येत नाहीत, तसेच काहीसे पर्मनंट मेकअपच्या बाबतीतही आहे. हा मेकअप सहजी काढून टाकता येत नाही. त्यामुळे हा मेकअप करविण्याआधीच ह्याबद्दल योग्य ती सर्व माहिती घेउन मग निर्णय घेणे अगत्याचे आहे. हा मेकअप करताना वापरले जाणारे रंग उत्तम प्रतीचे आणि पूर्णपणे सुरक्षित असले, तरी एखाद्या क्लायंटला ह्या रंगांची अॅलर्जी येण्याचा धोका नाकारता येत नाही. त्यामुळे पर्मनंट मेकअपचा पर्याय निवडण्यापूर्वी आपल्याला ह्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या रंगांची अॅलर्जी नसल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे विसरू नये.

पर्मनंट मेकअप करताना वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा वापर सर्वच क्लायंटस् साठी होत असतो. त्यामुळे ही प्रक्रिया करविताना सर्व उपकरणे निर्जंतुक करून मगच वापरली जात असल्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे. अश्याने एकाचे त्वचा विकार दुसऱ्याकडे फैलावण्याची शक्यता टाळता येते. तसेच उपकरणे निर्जंतुक असली, म्हणजे त्वचेवर कोणत्याही प्रकारची इन्फेक्शन होण्याचा संभवही कमी होतो. हा मेकअप कायमस्वरूपी असला, तरी ह्याला ही थोड्या थोड्या काळाने ‘टच-अप’ ची आवश्यकता असते. कालांतराने हा मेकअप फिका पडत जातो. त्यामुळे तो पुन्हा पूर्ववत करण्यासाठी ह्या मेकअपला देखील टच-अप करावे लागते. त्यासाठी मेकअप टेक्निशियन कडे जाण्यची आवश्यकता असते.

आजकाल कपड्यांच्या फॅशन, ट्रेंड्स खूप लवकर लवकर बदलत राहतात. हीच तऱ्हा मेकअपची देखील आहे. सध्या जाड भुवया, किंवा ग्राफिक लायनर्स जास्त चलनात आहेत. पण कालंतराने ही ट्रेंड बदलू शकते. अश्यावेळी पर्मनंट मेकअपमध्ये त्या विशिष्ट काळामध्ये चलनात असलेल्या ट्रेंडबरहुकूम बदल करणे शक्य होत नाही. त्यामुळे पर्मनंट मेकअप करविण्याचा निर्णय विचारपूर्वक घेणे आवश्यक आहे.

Leave a Comment